भाजपच्या मुखपत्रात नरेंद्र मोदींवरच टीका

भाजपमधील आंतरकलह अजूनही संपण्याचे नावच घेत नाही. पार्टीचे वरीष्ठ नेता लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमधून नितीन गडकरींवर ताशेरे ओढल्यानंतर आता भाजपचं मुखपत्र असलेल्या ‘कमल संदेश’मधून नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करण्यात आला आहे. मुखपत्रात कुणाचंही नाव न पार्टीतल्या काही नेत्यांना मोठं होण्याची घाई झालेली आहे, असं लिहिण्यात आलं आहे.

Updated: Jun 1, 2012, 05:23 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

भाजपमधील आंतरकलह अजूनही संपण्याचे नावच घेत नाही. पार्टीचे वरीष्ठ नेता लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमधून नितीन गडकरींवर ताशेरे ओढल्यानंतर आता भाजपचं मुखपत्र असलेल्या ‘कमल संदेश’मधून नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करण्यात आला आहे. मुखपत्रात कुणाचंही नाव न पार्टीतल्या काही नेत्यांना मोठं होण्याची घाई झालेली आहे, असं लिहिण्यात आलं आहे.

‘कमल संदेश’च्या नव्या अंकात संपादकीयमध्ये मोदींवर टीका करताना लिहिण्यात आलं आहे की, ‘जेव्हा एका ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते, तेव्हा खूप घाईत असणाऱ्या माणसालाही दुसऱ्या ट्रेनसाठी थांबून राहावंच लागतं. घाई आहे म्हणून ती व्यक्ती ट्रेनमधल्या व्यक्तीला खाली खेचत नाही की ट्रेन फोडत नाही, दगडफेक करत नाही. कारण जर स्वतःचीच ट्रेन त्याने स्वतः तोडली, तर तो आपल्या ठरलेल्या ठिकाणापर्यंत कसा पोहोचेल? पार्टी कुण्या एकाच्या योगदानावर चालत नाही. ‘मी म्हणेन तेच खरं’ अशा हट्टीपणाने पार्टीच काय साधं कुटुंबही नाही टिकू शकत.’

कमल संदेशचा हा अंक आजच प्रकाशित झाला आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या वेळी नरेंद्र मोदींनी यावं यासाठी ज्या प्रकारे संजय जोशींना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आलं, पार्टीला मोदींपुढे झुकावं लागलं; या संदर्भात ‘कमल संदेश’मध्ये हे लिहिण्यात आलं आहे.