www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. कारवाईला विरोध करणारे नागरिक आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्यानं पोलिसांनी थेट नागरिकांवर लाठीचार्ज केला.
औरंगाबादेत गेल्या तीन महिन्यांपासून रस्ता रूंदीकरण मोहिम सुरु आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यास महापालिकेनं सुरुवात केली आहे. औरंगाबाद इथल्या औरंगपुरा भाजीमंडईत अतिक्रमण हटवत असताना जमावाने विरोध केला.
या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी महापालिका अधिकारी आणि नागरिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. अतिक्रमण हटविण्यास विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी लाठीचार्ज सुरू करताच नागरिक देखील जास्तच आक्रमक झाले होते. त्यामुळे काही काळ तेथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.