बुडालेल्या जहाजावरील नायगावचा रसेल बेपत्ता

इटलीत समुद्रात बुडालेल्या कोस्टा कॉन्कोर्डिया प्रवासी जहाजावरील सर्व वसईकर कर्मचारी सुखरूप असल्याची बातमी आली खरी. मात्र, नायगावच्या मरियमनगर भागातील रसेल रिबेलो हा ३३ वर्षीय युवक अजूनही बेपत्ताच आहे.

Updated: Jan 17, 2012, 01:22 PM IST

www.24taas.com, मुंबई

इटलीत समुद्रात बुडालेल्या कोस्टा कॉन्कोर्डिया प्रवासी जहाजावरील सर्व वसईकर कर्मचारी सुखरूप असल्याची बातमी आली खरी. मात्र, नायगावच्या मरियमनगर भागातील रसेल रिबेलो हा ३३ वर्षीय युवक अजूनही बेपत्ताच आहे.

रसेलचे कुटुंबीय  मुंबईतल्या नायगावमध्ये राहतात. रसेल गेली सहा वर्षांपासून या जहाजावर स्टीवर्ड म्हणून काम करतो. रसेलच्या कुटुबीयांना काल सकाळी तो सुरक्षित असल्याची माहिती मिळाली होती. मात्र,  काल रात्री इटलीत राहणाऱ्या रसेलच्या मोठ्या भावाने बोट बुडालेल्या टस्कन किनाऱ्यावरील सर्व हॉस्पिटल्स आणि हॉटेल्स धुंडाळली. मात्र, रसेलचा काही शोध  लागला नाही. त्यामुळं सारं कुटुंबच आता काळजीत पडलं आहे. आम्ही आमच्या मुलाला गमावू इच्छित नाही, अशी आर्त हाक रसलच्या आईनं दिली आहे.

मुंबईत रसेलची पत्नी, साडेतीन वर्षाचा मुलगा आणि आई-वडील राहतात. तर भारतीय दूतावासाकडून आमच्या मुलाच्या ठावठिकाणाबाबत आम्हाला अजूनही काहीही कळवण्यात आलं नसल्याचं रसलच्या वडिलांनी सांगितलं आहे.