www.24taas.com, रत्नागिरी
रत्नागिरीत गेल्या दोन वर्षाप्रमाणेच यंदाही पावसाळ्यात लेप्टोची साथ पसरतेय. जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये १०५ रुग्ण उपचारासाठी दाखल झालेत. आरोग्य यंत्रणा लेप्टो निवारणासाठी प्रयत्नशील असताना जिल्हापरिषदेचे अधिकारी मात्र बेफिकीर असल्याचं दिसतंय.
कोकणात गेल्या दोन वर्षापासून लेप्टोची साथ पावसाळ्यात उद्भवतेए. यंदाही पुन्हा एकदा जुलैमध्येच लेप्टोच्या साथीनं डोकं वर काढलंय. सध्या विविध शासकीय रुग्णालयांमध्ये १०५ रुग्ण लेप्टोच्या उपचारासाठी दाखल झालेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आरोग्याविभागानं गावागावात सर्वेक्षण सुरू केलं असून वैद्यकीय पथकं तैनात ठेवलीए. मात्र, लेप्टोच्या निदानासाठी लागणाऱ्या ब्लड सेपरेशन युनिटबाबत अधिकारी बेफिकीर असल्याचं चित्र आहे. ऑपरेटरच नसल्यामुळे हे युनिट चक्क जिल्हा रुग्णालयात पडून आहे. मात्र या प्रकाराची साधी माहितीही अधिकाऱ्यांकडे नाही. लेप्टोसारख्या आजारानं रुग्ण दगावलेले असताना अधिकारी मात्र, बेफिकीरपणे उत्तर देत आहेत. दरम्यान, रुग्णांच्या रक्ताची तपासणी केली जात असली तरी, तपासणीसाठी रक्त कोल्हापुरात पाठवलं जात नाही तसंच ब्लड सेपरेशन यूनिटचा याच्याशी संबंध नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार उदय सामंत यांनी दिलीय.
लेप्टोची साथ नियंत्रणात आणण्यासाठी खेड्यापाड्यात औषधं वाटपाचं काम आरोग्य यंत्रणा करत आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येतंय. एरवी डॉक्टरांना मारहाण करणारे पुढारी मात्र झोपेचं सोंग घेऊन आहेत. त्यामुळे सामान्यांनी बघायचं तरी कुणाकडे असा संतप्त सवाल कोकणवासीय करत आहेत.