www.24taas.com, नागपूर
आठवडय़ातून तीनवेळा धावणारी ही गाडी रविवारपासून नागपूरहून दररोज धावणार आहे. केवळ ११ तासांत नागपूर- मुंबई प्रवास पूर्ण करणारी दुरांतो एक्स्प्रेस आजपासून आठवडय़ातील सातही दिवस धावणार आहे.
दुरांतो एक्स्प्रेसला वातानुकूलित प्रथम श्रेणीचा १, एसी टू टियरचे २, एसी थ्री टियरचे ३, शयनयान श्रेणीचे ८, दोन एसएलआर व एक पॉवर कोच असे एकूण १७ डबे आहेत. सध्या मुंबई ते हावडा दरम्यान आठवडय़ातून चारवेळा, तर पुणे- हावडा दरम्यान आठवडय़ातून दोनवेळा दुरांतो धावते. दुरांतो एक्स्प्रेसला मधल्या स्थानकांवर कर्मचारी बदलण्यासाठी आणि तांत्रिक कारणांसाठी काही थांबे असले, तरी प्रवाशांना या स्थानकांची किंवा तेथून तिकीटे मिळणार नाहीत.
आठवडय़ातून चार दिवसांच्या फेऱ्या वाढल्यामुळे या गाडीत आणखी ४ हजार ६८ शायिका उपलब्ध होणार आहेत. आता ही गाडी दररोज धावणार असल्याने विदर्भ एक्स्प्रेस आणि सेवाग्राम एक्स्प्रेसमधील प्रतीक्षा यादी कमी होऊन मुंबई- नागपूर दरम्यानच्या प्रवाशांना फायदा होईल, अशी आशा विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांनी व्यक्त केली.