www.24taas.com, पुणे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांसाठी शंभर पावलं पुढे येईन, असं राज ठाकरेंनी मुंबईतील कालच्या सभेत म्हंटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय. शंभर पावलं पुढे आलात तरी बाळासाहेबांचा महामार्ग हा अग्नीपथ आहे, तो झेपेल का, असा सवाल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना केला आहे. ते पुणे येथे बोलत होते.
अजित पवारांनाही चिमटा
दरम्यान, पुण्यातील दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवारांवर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शरसंधान साधलंय. दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवता ही तुमची टगेगिरी मग औरंगाबादचं संभाजीनगर करण्यासाठी पुढे का येत नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरेंनी पुण्यातल्या सभेत केला आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते-
बाळासाहेब म्हणतात, राज ठाकरेने एक पाऊल पुढे टाकायला हवे, तर मी सांगतो बाळासाहेब तुमच्यासाठी मी १०० पाऊले टाकायला तयार आहे. पण उद्धव आणि त्याच्या चार-पाच नादान टाळक्यांसाठी एक पाऊलही टाकायची तयारी नाही.
मुंबई महापालिकेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडणुकीची प्रचारसभा काल वरळीतील जांभोरी मैदानावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना काही खडे प्रश्न विचारले आणि काही खुलासेही केले. यावेळी त्यांनी फक्त शिवसेनेला टार्गेट केले होते.
एक काय शंभर पाऊले ...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांच्या मुलाखती सर्व वृत्तवाहिन्यांवर होत आहे. त्यातील बाळासाहेबांच्या मुलाखतीचा संदर्भ घेऊन राज ठाकरे यांनी भाषणात टोलेबाजी केली. ते म्हणाले, बाळासाहेब म्हटले की दोन्ही आमचे दरवाजे खुले आहेत. तर मीही म्हणतो माझेही दरवाजे खुले आहेत. तुम्ही सांगितले एक पाऊल टाका, तुमच्यासाठी मी एक काय शंभर पाऊले टाकेल, पण उद्धव आणि त्याच्या नादान टाळक्यांसाठी एक पाऊलही टाकायची माझी तयारी नाही. कशासाठी टाकू एक पाऊल मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचारासाठी, येथे न होणाऱ्या कामांसाठी असे भेदक प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थितीत केले होते.
उद्धव ठाकरेंनी राज यांना काय केला सवाल . . पाहा व्हिडिओ
[jwplayer mediaid="47735"]