पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. सक्तवसुली संचालनालय तसंच राज्य सरकारने डीएसकेंच्या जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढावी असं या आदेशात म्हटलं आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांची पत्नी तुरूंगात आहेत.
दरम्यानच्या काळात डीएसके आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या एकूण ४६३ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात स्थावर आणि जंगम मालमत्तांचा समावेश आहे. २००० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा डीएसकेंवर आरोप आहे. कर्जदात्या बँकांसह सुमारे ३३००० गुंतवणूकदारांची त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे ठेवीदार तसंच बँकांचे पैसे परत मिळावेत यासाठी डीएसकेंच्या जप्त संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश देण्यात आलेत.
हरकती नोंदवण्यासाठी ३ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान डी. एस. के त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या तेरा आलिशान गाड्यांचा येत्या १५ फेब्रुवारीला लिलाव होणार आहे. डीएसके यांच्याकडील ४६ पैकी २० वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत. लिलाव करण्यात येणाऱ्या वाहनांची किंमत दोन कोटी ५७ लाख ५० हजार रुपये इतके आहे.