हेमंत चापुडे, झी मिडीया, आंबेगाव : राज्यात मोठा राजकीय भूकंप येणारा. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपच्या (BJP)वाटेवर असल्याची चर्चा रंगलेय. त्यातच आता मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीत मोठी दुफळी निर्माण झाली आहे. माजी गृहमंत्र्यांच्या निकटवर्तीयानेच बंड केले आहे. या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे (Maharashtra Politics ).
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर निकटवर्तीय देवदत्त निकम यांनी वेगळा पॅनल करून राष्ट्रवादी काँगेस मधील दुफळी समोर आणली आहे. तर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा आदेश न मानता बंडखोरी केली. यामुळे देवदत्त निकम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याची एकहाती सत्ता असलेल्या बाजार समिती मध्ये त्यांचेच निकटवर्तीय देवदत्त निकम यांनी बंडखोरी केल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तिरंगी लढत होणार आहे. याचा फटका महाविकास आघाडीला होऊ शकतो तर तिकडे भाजपा आणि शिंदे गट शिवसेना यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मात्र, आता राष्ट्रवादी पक्षातील पडलेली दुफळी काढण्यात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना यश येतंय का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तर मी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातच राहणार असल्याचे निकम यांनी Zee 24 तास शी बोलताना सांगितल आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत असं मोठं विधान नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले होते. अजित पवार यांच्यासह काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यावर प्रश्न विचारला असता मंत्री दादा भुसेंनी हे विधान केले होते.
अजित पवार यांच्याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देखील वाद झाला आहे. 'सामना'वृत्तपत्रातील रोठ ठोक या विशेष सदरामध्ये संजय राऊत यांनी वेगळीच भूमिका मांडली होती. यामुळे राष्ट्रवादीतील काही नेते भाजपसोबत जाणार अशी चर्चा रंगली होती. "कोणालाही भाजपसोबत जायचे नाही, मात्र कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे". उद्धव ठाकरें यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी ही भूमिका मांडल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचे संजय राऊत म्हणाले होते. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येवून भूमिका मांडली.