धक्कादायक! ऑनलाईन क्लासमध्ये सुरु झाला अश्लिल व्हिडिओ, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संताप

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातील हा धक्कादायक प्रकार, सायबर सेलकडून चौकशी सुरु

Updated: Aug 3, 2021, 05:26 PM IST
धक्कादायक! ऑनलाईन क्लासमध्ये सुरु झाला अश्लिल व्हिडिओ, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संताप

पुणे : जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. अनेक व्यवहार बंद आहेत, कोरोनामुळे शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिलं जात आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही बहुतांश विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांसाठीही नवी आहे. त्यामुळे त्याचे फायदे-तोटेही तितकेच  आहेत. अशात या प्रणालीदरम्यान काही गैरप्रकारही पुढे येत आहे. असाच एक गैरप्रकार पुणे जिल्ह्यात समोर आला आहे.

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील एका इंग्लिश मिडीयम शाळेत झूम ॲप द्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिलं जात होतं. पण अचानक असं काही घडलं की शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही धक्का बसला. नेहमीप्रमाणे या शाळेचे ऑनलाईन क्लास सुरु होते. पण शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच अचानक अश्लिल चित्रफित सुरु झाली. हि चित्रफित लेक्चरमध्ये सहभागी झालेल्या काही विद्यार्थी आणि विद्यार्थींनींना दिसल्यानंतर विद्यार्थी तातडीने लेक्चर सोडून ऑनलाईन अॅप मधून बाहेर पडले. 

या सर्व प्रकाराची माहिती विद्यार्थ्यांनी पालकांना दिल्यानंतर पालकांनी तातडीने शाळेशी संपर्क साधल्यानंतर शाळेच्या वतीने शिक्षणाधिकार्‍यांकडे तसंच पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. 

या प्रकरणाची सायबर सेलकडून चौकशी सुरू आहे. तसंच विद्यार्थी पालक आणि शिक्षकांकडून ऑनलाइन शिक्षणाची लिंक कुठे बाहेर जाणार नाही याची  दक्षता घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.