Pune DRDO Honeytrap Case: पुण्यातील डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकरची हनी ट्रॅपप्रकरणी पॉलिग्राफ चाचणी होणार आहे. एटीएसने पॉलिग्राफ चाचणीसाठी कोर्टात अहवाल सादर केला आहे.धक्कादायक बाब म्हणजे कुरुलकरला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी ज्या मोबाईल नंबरचा वापर करण्यात आला तो वायुदलातील शिपाई असल्याचं समोर आले आहे. निखिल शेंडे असे या शिपायाचं नाव आहे. तो सध्या बंगळुरुमध्ये आहे. कुरुलकरनंतर शेंडे अशी दोन प्रकरणे उघड झाल्यानंतर पुणे एटीएसने पॉलीग्राफ चाचणी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पॉलिग्राफ टेस्टमधून मोठं बिंग फुटणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एटीएस कोठडीत असलेला DRDOचा माजी संचालक प्रदीप कुरुलकर आता पोपटासारखा बोलायला लागला आहे. त्याच्या चौकशीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कुरुलकरला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी ज्या नंबरचा वापर करण्यात आला होता तो वायुदलातील शिपाई निखिल शेंडेचा असल्याचं समोर आलंय. कुरुलकरनं पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ताचा नंबर ब्लॉक केला होता. त्यावेळी झारानं दुस-या क्रमांकावरुन कुरुलकरला मला ब्लॉक का केलं असा मेसेज पाठवला, तो नंबर शेंडेचा असल्याचं समोर आलंय. कुरुलकरच्या हनी ट्रॅपबद्दलही वेगळीच माहिती समोर आली आहे.
झारा दासगुप्ताने कुरुलकराशी जवळीक वाढवली. कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये फसला असला तरी झाराने त्याला ब्लॅकमेल केलं नाही. प्रेमाने आणि गोडगोड बोलून त्याच्याकडून माहिती काढून घेतली. गोड बोलून ब्राह्मोस, अग्नी क्षेपणास्त्रांविषयी गोपनीय माहिती मिळवली असा एटीएसला संशय आहे. ब्लॉक केल्यावर झाराने कुरुलकरला मेसेज करण्यासाठी निखिल शेंडेचा नंबर का आणि कसा वापरला याबाबत एटीएस तपास करत आहे.
याप्रकरणात सखोल तपास करण्यासाठी कुरुलकरची पॉलिग्राफ चाचणी करण्यात येणार आहे. तर वायूदलाकडून निखिल शेंडेची चौकशी सुरु आहे. दरम्यान कुरुलकरवर अजूनही देशद्रोहोचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्याच्यावर ऑफिशियल सिक्रेट अऍक्टनुसार कारवाई सुरु आहे. त्यामुळे काही सामाजिक संस्था आक्रमक झाल्या आहेत.
कुरुलकर प्रकरण दिसतं तेवढं साधं नाही, हे प्रकरण आणखी खोलवर जाण्याची शक्यता आहे. देशाशी गद्दारी करणारी कुरुलकरसारखी लोकं समाजाला लागलेली कीड आहे. त्यामुळेच कुरुलकर प्रकरणाचा खोलवर तपास सुरु करण्यात आला आहे.