बापलेकीचं 'ते' संभाषण ठरलं शेवटचं, अश्विनीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी सांगितली आठवण

Pune Porsche Accident: आपलं लेकीसोबत शेवटचं काय बोलणं झालं...याच्या आठवणीच आता त्यांच्याकडे आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: May 21, 2024, 05:05 PM IST
बापलेकीचं 'ते' संभाषण ठरलं शेवटचं, अश्विनीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी सांगितली आठवण title=
Ashwini Costa Father Reaction

Pune Porsche Accident: 'बाबा मी जेऊन येते...' असं म्हणून ती घराबाहेर पडली. मित्रासोबत बाईकच्या मागे बसली होती. इतक्यातच भरधाव वेगाने आलेल्या कारने तिला धडक दिली. काही वेळात तिचं आयुष्य संपलं आणि वडिलांसोबत तिचं बोलणं शेवटचं ठरलं. अश्विनी कोस्टा असं तिचं नाव. ती पेशानं इंजिनीअर होती. म्हाताऱ्या वडिलांना तरुण लेकीचा मृतदेह पाहताना हुंदका आवरत नव्हता. आपलं लेकीसोबत शेवटचं काय बोलणं झालं...याच्या आठवणीच आता त्यांच्याकडे आहेत. 

पुण्यातील व्यावसायिक वडिलांच्या लेकाने आपल्या 2 कोटींच्या पोर्श गाडीखाली दोघांना चिरडलं. अल्पवयीन असल्याचे कारण सांगून निबंध लिहण्याची शिक्षा सुनावली आणि त्याला जामिनही मंजूर करण्यात आला. पण जनसामान्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि पोलीस प्रशासनाला कठोर पाऊले उचलावी लागली. या घटनेत मृत पावलेली अश्विनी आणि अनीश दोघे मूळचे जबलपूरचे आहेत. अश्विनी आपल्या करिअरसाठी मध्य प्रदेशच्या जबलपूरमधून पुण्यात आली होती. आयटी इंजिनीअर असलेली अश्विनी पुण्यात जॉब करत होती. 

अश्विनी कोस्टा आता पंचतत्वात विलीन झाली आहे. पण तिच्या परिवाराकडे आता फक्त तिच्या आठवणीच राहिल्या आहेत. अश्विनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ वडिलांवर आली. रडून रडून त्यांची अवस्था खराब झाली. इंजिनीअर लेक डोळ्यात स्वप्न घेऊन जबलपूरमधून पुण्याला गेली, त्यावेळी आईवडिलांची छाती गर्वाने फुलली होती. पण आता अश्रूंचा महापूर आलाय. 

अश्विनीचे वडिल सुरेश कोस्टा यांच्या रागाला पारावर उरला नाहीय. एका धनदांडग्याच्या लेकामुळे माझी 24 वर्षांची लेक या जगात नाहीय, असे सांगताना त्यांचा कंठ दाटून येतोय. पुण्याच्या रस्त्यावर दारुच्या नशेत पोर्शे गाडी चालवणाऱ्या तरुणाने अश्विनीला अशाप्रकारे चिरडलं की तिचा मृत्यूच झाला. 

अश्विनीला एक भाऊ आहे. दोघेही मुलं इंजिनीअर आहेत. त्यांचे आईवडिल जबलपूरमध्ये राहतात. रात्री 10 वाजता अश्विनीचे आपल्या वडिलांसोबत बोलणं झालं होतं. मी जेवायला जात आहे, असे ती म्हणाली. यानंतर मुलीसोबत काही बोलणं झालं नसल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. 

मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांना पौर्शे चालक, पोलीस प्रशासनावरील राग अनावर झाला. पोलिसांना ट्रॅफीकच्या नियमांची काळजी आहे की नाही? अल्पवयीन मुलगा वेगाने गाडी चालवतोय. दारु प्यायलाय आणि पोलीस फक्त हेल्मेट चेकींग करतेय, असे ते म्हणाले. 

माझी पुतणी साधी होती. ती शिक्षणातदेखील हुशार होती. मागच्या वाढदिवसाला ती जबलपूरमध्ये आली होती. काही दिवस राहिल्यानंतर ती पुण्याला परतली. पण आता ती या जगात नाहीय, असे तिचे काका अयोध्या कास्टा यांनी सांगितले.