Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्यात करावी स्वामींची 'ही' सेवा, अशक्य ही शक्य करतील स्वामी

Margashirsha 2023 : कार्तिक महिन्यानंतर येणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. श्रावण महिन्या एवढंच मार्गशीर्ष महिन्याला महत्त्व आहे. या महिन्यात केलेली सेवा ही देवाच्या चरणी पोहोचते असं म्हणतात. 

नेहा चौधरी | Updated: Dec 4, 2023, 02:57 PM IST
Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्यात करावी स्वामींची 'ही' सेवा, अशक्य ही शक्य करतील स्वामी title=
Margashirsha 2023 Shri Swami Samarth Eleven Thursday fast or vrat Swami will make the impossible possible and Mahalakshmi Vrat

Margashirsha 2023 :  हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरु वारला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यात श्री स्वामी समर्थांची सेवा केल्याने अशक्य ही शक्य करतील स्वामी याची प्रचिती येते. स्वामी भक्त अनेक प्रकारे स्वामींची सेवा निरंतर करत असतो. पण मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रतासोबत तुम्ही स्वामींचं व्रतही करु शकता. चला जाणून घेऊयात स्वामी समर्थ व्रताबद्दल. (Margashirsha 2023 Shri Swami Samarth Eleven Thursday fast or vrat Swami will make the impossible possible and Mahalakshmi Vrat)

मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरु होतो आहे?

पंचांगानुसार 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरूवात होणार आहे. तर  11 जानेवारीला संध्याकाळी 5:27 वाजेपर्यंत आहे. 

मार्गशीर्ष महिन्यात कशी करायची स्वामींची सेवा ?

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी म हालक्ष्मी व्रतासोबत तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचे अकरा गुरुवारचे व्रत करु शकता. या व्रताबद्दल अनेक स्वामी भक्तांना माहिती आहे. जर तुम्हालाही याबद्दल माहिती नसेल तर स्वामींची या सेवेबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहात. बरेच जण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील अकरा गुरुवारचे व्रत स्वामी सेवेमध्ये करतात. शिवाय हे व्रत केल्याने आयुष्यात कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठीही केलं जातं. कामात यश आणि प्रगतीसाठी स्वामींचं हे व्रत अनेक भक्त करतात. 

स्वामींचं व्रत करताना अशी करा पूजेची मांडणी!

तुम्हालाही स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत करायचे असेल तर पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूयात. हे व्रत करताना स्वामींवर अखंड श्रद्धा आणि विश्वास असावा. हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरु करावे. गुरुवारी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार असाल ती जागा स्वच्छ करुन घ्या. चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र अंथरावं. यावर आता तुमच्या घरातील स्वामींचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना करावी. फोटो किंवा मूर्तीच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवावा. ही सगळी मांडणी केल्यानंतर अगरबत्ती, धूप दिवा प्रज्वलित करावा. आता स्वामींना सर्वप्रथम गंध लावावं. आता स्वामींनी चरणी एखादं फळ अर्पण करावं. साखर त्यावर तुळशीचं पान असलेली वाटी ठेवावी. त्यासोबत छोट्या लोटीतांब्यात पाणी ठेवावं. आता जिथे घंटी ठेवली आहे त्याच्यासमोर तुमच्या घरातील जपाची माळ ठेवा. त्यानंतर स्वामींच्या  फोटो किंवा मूर्तीला हार घाला. तुम्ही मिठाईचा प्रसादही दाखवा. जर तुमच्या घरात स्वामी समर्थांचं गुरुचरित्र सारामृत पोथी असेल तर ही पोथी पूजा मांडणीसोबत ठेवा. ही मांडणी करताना मनात फक्त स्वामींचं नाव जपा. इतर कुठलाही विचार मनात येऊ देऊ नका. 

हेसुद्धा वाचा - Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्याला कधीपासून सुरुवात? जाणून घ्या पहिला गुरुवार व महालक्ष्मीच्या व्रताबद्दल

स्वामींची सेवेचं व्रत संकल्प घ्या!

हे व्रत करण्यापूर्वी 11 गुरुवारचं व्रताचा संकल्प घ्याव्या. त्यासाठी एक ताट घ्या आणि एका ग्लासात पाणी घ्या. या ग्लासमध्ये चमचा ठेवा. या पाण्यात एक फुल टाकावं. आता व्रताचं संकल्प घेताना चमच्याने थोडसं पाणी उजव्या हातात घ्या. ते फुल सुद्धा हातात घेऊन तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वामींचं अकरा गुरुवारचं व्रत करत आहात, असं संकल्प घ्या. आता ते पाणी ताटात सोडावं. 

यासगळ्यानंतर तुम्हाला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. त्याबरोबर अकरा वेळा तारमंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. त्यानंतर सारामृत पोथी वाचा. पोथी वाचन झाल्यानंतर आरती करावी. नंतर प्रसादाचं वाटणं करावं. अशाप्रकारे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात अकरा गुरुवारचं व्रत करु शकता. संकल्प फक्त पहिल्या गुरुवारी करावं. 

हे व्रत करत असताना एखाद्या गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात जाऊन एक नारळ आणि खडी साखर अपर्ण करा. जर हे शक्य झालं नाही तर तुम्ही घरच्या घरी स्वामींच्या चरणी हे अपर्ण करु शकता. 
सकाळी वेळ नाही पण सेवा करायची आहे मग...

आजकाल अनेकांना सकाळी वेळ नसतो पण त्यांना श्री स्वामी समर्थांचं व्रत करायचं आहे. मग अशावेळी हे व्रत कसं करणार? तर तुम्ही सकाळी पूजेची मांडणी करु आरती करा. मग दिवसभरात किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा बाकीची पूजा करु शकता. म्हणजे तारकमंत्र, पोथी वैगरे वाचू शकता. 

अकरा गुरुवार शक्य नसेल तर?

जर तुम्हाला अकरा गुरुवार शक्य नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताला गुरुवारी तुम्ही संध्याकाळी महालक्ष्मीसमोर श्री सूक्त आणि महालक्ष्मी स्तुति पठण करा. त्यानंतर अकरा वेळा स्वामींच्या नावाचा जप करा. जर अकरा वेळा शक्य नसेल तर तीन वेळा माळ जप करा. 

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र 

नि:शंक हो निर्भय हो मना रे।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।।
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।
 
जिथे स्वामिपाय तिथे न्यून काय ।
स्वये भक्त - प्रारब्ध घडवी हि माय ।।
आज्ञेविणा ना काळ ना नेई त्याला ।
परलोकीही ना भीती त्याला ।।२।।

उगाची भितोसी भय हें पळू दे ।
जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे ।
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा ।
नको घाबरू । तू असे बाळ त्यांचा ।।३।।
खरा होई जागा । श्रद्धेसहीत ।
कसा होशी त्याविन तू स्वामीभक्त ।।
कितीदा दिला बोल त्यांनीच हात ।
नको डगमगू । स्वामी देतील साथ ।।४।।
 
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ ।
स्वामीच या पंच प्राणामृतात ।।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचीति ।
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)