Matru Din Celebrated on Pithori Amavasya : 'मातृदेवो भव', 'पितृदेवो भव' हा संस्कार लहानपणापासून आपल्यावर करण्यात येतो. पाश्चात संस्कृतीनुसार मे महिन्यामध्ये मडर्स डे साजरा करण्यात येतो. पण महाराष्ट्र जन्मदात्रीप्रती कृतज्ञता म्हणून श्रावण अमावस्येला मातृदिन साजरा केला जातो. महिन्याला एक आणि वर्षाला 12 अमावस्या येत असतात. त्यातील प्रत्येक अमावस्येला विशेष महत्त्व आहे. पिठोरी अमावस्या ही आदिशक्ती, दुर्गैची पूजा करण्यासाठी खास असते. यंदा पिठोरी अमावस्या शेवटच्या श्रावण सोमवारी आली आहे. सोमवार आल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या (Somvati Amavasya 2024) असंही म्हटलं जातं.
सुहासिनी महिला या दिवशी पिठाच्या मूर्ती करुन बाळाच्या जन्म आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या अमावस्येला पिठाचेच सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात, त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात. या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केले जातात. घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात. ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते. अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो.
या दिवशी घरी खीरपुरी करतात. घरात जेवढ्या व्यक्ती असतात, तेवढ्या खिरीच्या वाट्या पुरीने झाकून, आई विचारते, "अतिथी कोण ?" आईच्या मागे उभा असलेला मी म्हणतो, "आई मी उपेन", मग, पुरीने झाकलेली खिरीची वाटी, आई माझ्या म्हणजे अतिथीच्या हाती देते, मी आईला नमस्कार करतो, अतिथीची इच्छा पूर्ण करणं, हा या पिठोरीच्या व्रताचा संदेश. पिठोरी अमावास्येचं हे व्रत, आई आपल्या संततीच्या दीर्घायुष्यासाठी, संवर्धनासाठी करते.
पिठोरी अमावस्या (मातृदिन) तसे पाहिले तर बरेचदा आमवस्या म्हणजे अशुभ दिन असा एक प्रचलित प्रघात आहे. पण पिठोरी अमावस्येला केलेले व्रत कार्य शुभ ठरते. आईने मुलांसाठी करायचे जसे जिवितीचे व्रत तसेच पिठोरीचेही. कदाचित म्हणूनच याला 'मातृदिन' म्हणतात. आईचे पुण्य मुलांना मिळते. सुख - समुद्धी त्यांच्या दारी येते. भारतीय संस्कृतीत प्रत्येकांसाठी खास दिवस आहेत. त्यापैकी हा मातृदिन होय.
या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की, विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला मुले होत होती व ती लगेच मरण पावत होती. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले. पुढे ती पुन्हा घरी आली. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले. चौसष्ट योगिनींची पूजा केली आणि त्यांच्या आशीर्वादाने तिची मरण पावलेली सातही मुलं जिवंत झाल्यामुळे संतती रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वत:च्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठेरी अमावास्या करून देते. म्हणून ही अमावास्या महत्वाची आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)