२७ मार्चचा तो दिवस... सचिनच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली

सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन ६ वर्ष झाली आहेत.

Updated: Mar 27, 2019, 08:06 PM IST
२७ मार्चचा तो दिवस... सचिनच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली

मुंबई : सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन ६ वर्ष झाली आहेत. पण आजही तो भारतातलाच नाही तर जगातला लोकप्रिय खेळाडू आहे. क्रिकेट विश्वातली सगळी रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. सचिनने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यावरच स्वत:चा ठसा उमटवायला सुरुवात केली होती. पण आजच्याच दिवशी २५ वर्षांपूर्वी सचिनच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. यामुळे सचिनने क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड बनवले.

२७ मार्चला ऑकलंडमध्ये भारत न्यूझीलंडमध्ये दुसरी वनडे मॅच खेळणार होता. मॅच सुरु व्हायच्या काही तास आधीच ओपनर नवजोत सिंग सिद्धूच्या मानेची नस खेचली गेली आणि यामुळे सिद्धू ही मॅच खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं. यावेळी भारतीय टीममध्ये तिसरा ओपनर नव्हता. यामुळे कर्णधार अजहरुद्दीनने सिद्धू ऐवजी सचिनला ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय घेतला. २७ मार्च १९९४ साली सचिन पहिल्यांदा ओपनिंगला बॅटिंगला आला.

टॉस हरल्यानंतर पहिले बॉलिंग करताना भारतीय टीमची सुरुवात चांगली झाली. ३४ रनवरच भारताने न्यूझीलंडच्या ५ विकेट घेतल्या. क्रिस हॅरिसने अर्धशतक पूर्ण केलं. यानंतरही न्यूझीलंडची टीम ४९.४ ओव्हरमध्ये १४२ रनवर ऑल आऊट झाली. भारताकडून राजेश चौहानने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर कपिल देव, जवागल श्रीनाथ आणि सलिल अंकोलाने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

१४३ रनचा पाठलाग करण्यासाठी अजय जडेजा आणि सचिन तेंडुलकर ओपनिंगला आले. ऑकलंडच्या मैदानात रनचा पाऊस पडायला लागला. ही कारकिर्दीतली पहिली आणि शेवटची खेळी असल्यासारखा सचिन खेळत होता. 'मला ओपनिंगला खेळायची संधी द्या, जर अपयशी ठरलो तर पुन्हा कधीच ओपनिंग करणार नाही', असं सचिनने त्यावेळचे टीमचे मॅनेजर अजित वाडेकर यांना सांगितलं. सचिनने हा किस्सा त्याच्या आत्मचरित्रातही सांगितला आहे.

सचिनने या मॅचमध्ये फक्त ४९ बॉलमध्ये ८२ रनची खेळी केली, यामध्ये १५ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. सचिनने त्याच्या ८२ मधल्या ७२ रन बाऊंड्री मारून बनवल्या.

ओपनर म्हणून सचिनच्या नावावर ३४४ मॅचमध्ये १५,३१० रन आहेत. यामध्ये ४५ शतकांचा समावेश आहे. तर वनडे कारकिर्दीमध्ये सचिनने ४६४ वनडेमध्ये १८,४२६ रन केले आहेत, यामध्ये ४९ शतकं आहेत.