जोहान्सबर्ग : भारताविरुद्धची पहिली टी-20 गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का बसला आहे. वनडे सीरिजमध्ये आफ्रिकेचे तीन महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा वनडे सीरिजमध्ये ५-१नं पराभव झाला. आता आफ्रिकेचा दिग्गज बॅट्समन एबी डिव्हिलियर्स दुखापतीमुळे संपूर्ण टी-20 सीरिज खेळू शकणार नाही.
गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे डिव्हिलियर्स भारताविरुद्धच्या तीनही टी-20 खेळू शकणार नाही. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. पाचव्या वनडेच्या एक दिवस आधी डिव्हिलियर्सच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. पहिल्या ३ वनडेलाही एबी डिव्हिलियर्स मुकला होता. पण शेवटच्या दोन वनडेमध्ये डिव्हिलियर्स खेळला असला तरी त्यानं सराव केलेला नव्हता.
पाचव्या वनडेच्या आधी डिव्हिलियर्सच्या पायाला दुखापत झाली होती. शुक्रवारी फिटसनेस टेस्ट एबी डिव्हिलियर्सनं पास केली पण सहाव्या मॅचच्यावेळी एबीची दुखापत वाढली, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचे मॅनेजर मोहम्मद मुसाजी यांनी दिली आहे.
१ मार्चपासून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे. ही टेस्ट सीरिज खेळण्यासाठी डिव्हिलियर्सला आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टवेळी डिव्हिलियर्सच्या बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो पहिल्या तीन वनडेला मुकला होता. चौथ्या वनडेमध्ये डिव्हिलियर्सनं कमबॅक केलं पण उरलेल्या मॅचमध्ये त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही.