मुंबई : काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात क्रिकेटर अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) आपल्या आजीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण अजिंक्यची ही इच्छा अपूर्णच राहिली आहे. अजिंक्य रहाणेची आजी झेलूबाई बाबूराव रहाणे (Ajinkya Rahanes Grandmother Zelubai Baburao Rahane died) यांचे निधन झाले आहे. अजिंक्यसाठी हा खूप मोठा धक्का आहे. अजिंक्यसाठी आजी ही कुटुंबातील सर्वात जवळची व्यक्ती होती.
अजिंक्यचे बाबा मधुकर बाबूराव रहाणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. अजिंक्य सध्याच्या घडीला आयपीएलची तयारी करत असून अजिंक्य आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघात आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना १० एप्रिलला वानखएडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी तयारी करत असताना अजिंक्यला ही वाईट बातमी समजली आहे.
गणेश रहाणे यांनी याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर ही बातमी सर्वांना समजली आहे. करोनाच्या संसर्गामुळे सर्वांनी घरी राहूनच झेलूबाई बाबूराव राहाणे यांना श्रद्धांजली वाहावी, असेही या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे.
अजिंक्यने काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये आजीला भेटायची खूप इच्छा असल्याच सांगितलं होतं. संगमनेरला कधी जाणार, असा प्रश्न अजिंक्यला काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीध्ये विचारण्यात आला होता. त्यावेळी अजिंक्य म्हणाला होता की, " कोरोनीचा परिस्थिती सुधारल्यावर मी आजीला भेटायला जाणार आहे. माझी आजी संगमनेरला असते. तिला भेटायची माझी इच्छा आहे. पण सध्याच्या कोरोनाच्या काळात मला तिला भेटता आलेले नाही. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती सुधारली की लगेचच मी माझ्या आजीची भेट घेण्यासाठी संगमनेर येथे जाणार आहे.."
पण अजिंक्यला आता आजीला भेटता येणार नाही. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे.