मुंबई : क्रिकेटच्या विश्वात दररोज नवीन विक्रम होत असतात. पण काही विक्रमांना कित्येक वर्ष कोणताच खेळाडू गवसणी घालू शकत नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेचंही असंच एक रेकॉर्ड अजूनही कायम आहे. मागच्या २० वर्षात कोणत्याच क्रिकेटपटूला या रेकॉर्डच्या जवळपासही पोहोचता आलं नाही. २० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे १९९९ साली अनिल कुंबळेनं एकाच डावात १० विकेट घेण्याचा विक्रम केला होता. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात झालेल्या टेस्टमध्ये पाकिस्तानविरुद्ध कुंबळेनं ही कामगिरी केली होती.
एका डावात संपूर्ण टीमला बाद करणारा अनिल कुंबळे हा दुसराच गोलंदाज ठरला. याआधी असा पराक्रम इंग्लंडच्या जीम लेकर यांनी केला होता. जीम लेकर यांनी १९५६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली होती. अशी कामगिरी करणारा अनिल कुंबळे हा क्रिकेट विश्वात जीम लेकर नंतरचा दुसरा आणि भारताचा पहिलाच बॉलर आहे. १९९९ साली पाकिस्तानची टीम भारत दौऱ्यावर होती. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी हा विक्रम कुंबळेने केला होता.
२०१९ साली कुंबळेच्या एका डावात १० विकेट घेण्याच्या विक्रमाला २० वर्ष पूर्ण होत असतानाच, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात १० विकेट घेण्याची कामगिरी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सी.के.नायडू ट्रॉफीमध्ये १९ वर्षांच्या सिदक सिंहने पाँडेचरीसाठी खेळताना एका डावात १० विकेट घेतल्या. यानंतर कूच बिहार ट्रॉफीत मणिपूरच्या रेक्स राजकुमार सिंहने एका डावात १० विकेट घेण्याची कामगिरी केली होती.
भारताने पाकिस्तानविरुद्धच्या या दुसऱ्या टेस्टमध्ये पाकिस्तानला विजयासाठी ४२० रनचं आव्हान दिले होते. या ४२० रन करण्यासाठी पाकिस्तानकडे २ दिवसांचा वेळ होता. पाकिस्तानने सुरुवात देखील उत्तम केली होती. बिनबाद १०१ रन केल्या होत्या. यामुळे विजयासाठी पाकिस्तानला ३१९ रनची गरज होती. अशावेळी कुंबळेने आपली जादू दाखवायला सुरुवात केली. कुंबळेने पाकिस्तानला पहिला झटका १०१ रनवर दिला. एकवेळ पाकिस्तान जिंकेल असे वाटत असताना कुंबळने आपल्या फिरकीच्या जादूने पाकिस्तानला २०७ रनवर ऑलआऊट केलं.