FIFA World Cup Semi- Final Argentina Vs Croatia: फीफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया यांच्यात सामना रंगणार आहे. क्रोएशिया संघाकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जातं. फीफा वर्ल्डकप 2018 स्पर्धेतही क्रोएशियाने उपांत्य फेरीत इंग्लंडला 2-1 ने पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत फ्रान्सनं क्रोएशियाचा 4-2 ने पराभव करत विश्व चषकावर नाव कोरलं होतं. यंदाच्या विश्वचषकातही क्रोएशियाची कामगिरी उत्तम राहिली आहे. स्पर्धेत दिग्गज संघांना घराचा रस्ता दाखवल्यानंतर वर्ल्डकप इतिहासात दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. यावेळी मेस्सीचा अर्जेंटिना संघ समोर आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रोएशियाने आपली रणनिती आखली आहे. क्रोएशियाचा प्रशिक्षक झ्लात्को डालिक यांनी अर्जेंटिना विरुद्ध खास व्यूहरचना आखली आहे.
क्रोएशियाचा प्रशिक्षक झ्लात्को डालिक यांनी सांगितलं की, "आम्हाला आनंद आहे की, सलग दुसऱ्या विश्वचषकात संघानं उपांत्य फेरी गाठली आहे. पण आमचं लक्ष्य या पुढे आहे. आता आमचा सामना बलाढ्य अर्जेंटिनाशी होणार आहे. हा संघ लियोनल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. त्याच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे. पण असं असलं तरी ते आमच्या खेळताना दबावाखाली असतील. आम्ही त्यांच्या खेळाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे. आम्हाला माहिती आहे ते कशाप्रकारे खेळतात. त्यामुळे आमची रणनिती स्पष्ट आहे. ही रणनिती तुम्हाला उपांत्य फेरीच्या सामन्यात दिसेल."
बातमी वाचा: FIFA WC 2022: उपांत्य फेरीत अर्जेंटीनाचा मेस्सी खेळणार नाही? कारण...
दुसरीकडे अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लियोनेल स्कॅलोनी यांनीही उपांत्य फेरीसाठी कंबर कसली आहे. अर्जेंटिनाचे दोन प्रमुख खेळाडू निलंबनामुळे या सामन्यासाठी मुकणार आहेत. यात लेफ्ट बॅक मार्कोस अकुना आणि राईट बॅक गोलझॅलो मोन्शेल यांना खेळता येणार नाही. "क्रोएशियाचा संघ खरंच चांगली कामगिरी करत आहे. आम्ही या संघाला दुय्यम मानत नाही. ते एक टीम म्हणून खेळत आहेत. त्यांचा खेळ आमच्यासाठी खरंच आव्हान आहे. त्यांची एक खेळण्याची पद्धत आहे. उपांत्य फेरीत त्यात काही बदल होईल असं वाटत नाही. आमच्या संघाची एक स्टाईल आहे आणि ही रणनिती आम्ही उपांत्य फेरीत बदलणार नाहीत."