सूरत : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं त्याच्या धमाकेदार कामगिरीनं पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं आहे. अंडर-१९ विनू मंकड ट्रॉफीमध्ये खेळताना अर्जुननं ३ विकेट घेतल्या. अर्जुनच्या या कामगिरीमुळे मुंबईनं आसामवर १० विकेटनं विजय मिळवला. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये आसामनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण आसामची सुरुवात खराब झाली. अर्जुननं दानीश अहमदला १ रनवर एलबीडब्ल्यू केलं. यानंतर अर्जुननं त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये ऋषिकेश बोराला १ रनवर आणि ऋतुराज विश्वासला शून्य रनवर माघारी पाठवलं.
आसामची टीम ४०.४ ओव्हरमध्ये ९९ रनवर ऑल आऊट झाली. अर्जुननं ७ ओव्हरमध्ये २ मेडन टाकून फक्त १४ रन दिले. अर्जुनबरोबरच मुंबईच्या दिव्यांशनं २ विकेट घेतल्या.
आसामच्या माफक आव्हानाचा पाठलाग मुंबईनं अगदी सहज केला. मुंबईनं २१.५ ओव्हरमध्ये १०२ रन केले. मुंबईकडून ओपनर यशस्वी जयस्वालनं नाबाद ५६ रन तर सुवेद पारकरनं नाबाद ४१ रन केले. यशस्वीनं ६५ बॉलचा सामना केला आणि ८ फोर मारले. सुवेदनं ६६ बॉल खेळले आणि ५ फोर मारले. याआधी यशस्वी जयस्वालला अंडर-१९ आशिया कपमध्ये मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं होतं.