Ind vs Pak Asia Cup 2022 : एशिया कप स्पर्धेला आता केवळ 2 दिवसांचा अवधी उरलाय. क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय ते 28 ऑगस्टला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या (India vs Pakistan) हायव्होल्टेज सामन्यावर. या सामन्यासाठी टीम इंडियाचा (Team India) जोरदार सराव सुरु झाल आहे.
भारतीय संघाच्या सराव शिबिरात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) तुफानी अंदाज पाहिला मिळाला. रोहित आणि विराटने फलंदाजीचा जोरदार सराव केला.
भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (BCCI) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून यात रोहित आणि विराट फलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत. सरावादरम्यान मोठे फटके मारण्याव्यतिरिक्त दोन्ही खेळाडूंनी सरावादरम्यान काही उत्कृष्ट ड्राइव्ह खेळले. बीसीसीआयने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधीच फॉर्मात दिसत आहेत.
एशिया कप स्पर्धेत भारतीय क्रिकेट प्रेमींना रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी या दोघांनाही विश्रांती देण्यात आली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतूनही विराटला वगळण्यात आलं होतं. या ब्रेकमुळे दोन्ही खेळाडू एशिया कप स्पर्धेपूर्वी मानसिकदृष्ट्या ताजंतवाने झाले आहेत.
Sound #TeamIndia captain @ImRo45 & @imVkohli get into the groove ahead of the first clash against Pakistan.#AsiaCup2022 | #AsiaCup pic.twitter.com/GNd8imnmM3
— BCCI (@BCCI) August 25, 2022
पाकिस्तानविरुद्ध रोहितची खराब कामगिरी
रोहित शर्माची पाकिस्तानविरुद्ध टी-20 सामन्यातली कामगिरी फारशी समाधानकारक नाही. पाकिस्तानविरुद्धच्या आठ सामन्यात रोहितला केवळ 70 धावा करता आल्या आहेत. तर त्याचा बेस्ट स्कोर आहे 30 धावा. पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यात तो दोनवेळा शुन्यावर बाद झाला आहे. आता हा रेकॉर्ड सुधारण्याची संधी रोहितकडे आहे.
विराटची शानदार कामगिरी
विराट कोहलीची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी शानदार राहिलीय. 2016 आणि 2021 वर्ल्ड कप स्पर्धेत विराटने हाफसेंच्युरी केली होती. एकदिवसीय सामन्यात विराटचा बेस्ट स्कोर 183 धावांचा आहे. एशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच त्याने ही दमदार कामगिरी केली होती.
गेल्या काही सामन्यात विराटचा फॉर्म खराब असला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या रेकॉर्डकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. एकदिवसी सामन्यात सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.