David Warner vs Glenn Maxwell Over BCCI : ऑस्ट्रेलियन संघाने नेदरलॅण्ड संघाविरुद्धचा सामना 309 धावांच्या विक्रमी फरकाने जिंकत सेमीफायनलमधील आपली दावेदारी अधिक मजबूत केली आहे. पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने विजयाची हॅटट्रीक केली आहे. मात्र या सामन्यामध्ये वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावे करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने बीसीसीआयच्या एका निर्णयावरुन नाराजी व्यक्त केली होती. मॅक्सेवलच्या या प्रतिक्रियेची चर्चा असतानाच ही प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचाच सलामीवीर आणि मॅक्सवेलचा सहकारी डेव्हीड वॉर्नरने खोडून काढली आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या निर्णयावरुन वॉर्नर आणि मॅक्सेवेल भिडल्याचं चित्र दिसत आहे.
नवी दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर करण्यात आलेल्या नाईट क्लब स्टाईल रोषणाईने ग्लेन मॅक्सवेल वैतागला. त्याने अशाप्रकारची रोषणाई करणं हा निव्वळ बावळटपणाची कल्पना आहे असं सामन्यानंतर म्हटलं. अशा रोषणाईमुळे डोकेदुखी होते असंही मॅक्सवेलने म्हटलं आहे. मॅक्सेवेलने केलेल्या दमदार आणि वेगवान खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नेदरलॅण्डवर 309 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यादरम्यानच्या ब्रेकमध्ये करण्यात आलेली रोषणाई पाहून मॅक्सवेलचं डोकं सटकलं. मॅक्सवेलने तब्बल 2 मिनिटं आपले डोळे हाताने झाकून घेतले होते.
मॅक्सवेलने 44 बॉलमध्ये 106 रन केल्याने ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सच्या मोदल्यात 399 धावांपर्यंत मजल मारता आली. नेदरलॅण्डचा संघ 21 ओव्हरमध्ये 90 धावा करुन तंबूत परतला. मॅक्सेवेलला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. "मी अशी रोषणाई पर्थ येथील स्टेडियमवर बिग बॅश लीगदरम्यानच्या सामन्यात पाहिली होती," असं मॅक्सवेलने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं. "ही रोषणाई पाहून माझं डोकं दुखू लागलं. माझ्या डोळ्यांना आजूबाजूचं परत सामान्यपणे पूर्वीसारखं दिसण्यासाठी काही वेळ लागला. क्रिकेटपटूंच्या दृष्टीने विचार केला तर ही सर्वात बावळटपणाची कल्पना आहे, असं मला वाटतं," असं स्पष्ट मत मॅक्सवेलने व्यक्त केलं आहे. "या रोषणाईचा त्रास होत असल्याने मी डोळे बंद करुन घेतले होते आणि त्या रोषणाईकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र हे फारच भयंकर होतं. फारच भयंकर कल्पना आहे की. चाहत्यांची उत्तम आहे मात्र खेळाडूंसाठी तितकीच भायानक आहे," असं मॅक्सवेलने स्पष्टपणे सांगितलं.
मॅक्सवेलच्या या वक्तव्यासंदर्भातील एका पोस्टवर डेव्हीड वॉर्नरने प्रतिक्रिया नोंदवली आहे. मॅक्सवेलने व्यक्त केलेल्या मताच्या अगदी विरुद्ध मत नोंदवलं आहे. 'मला ही रोषणाई फार आवडली. फार छान वातावरण होतं मैदानात. हे सर्व काही चाहत्यांसाठीच आहे. तुम्ही सर्व (चाहते) नसाल तर आम्ही सर्वजण आम्हाला जे आवडतं ते (क्रिकेट खेळणं) करु शकलो नसतो,' असं वॉर्नरने आपल्या एक्स अकाऊंटवरुन म्हटलं आहे.
वर्ल्ड कप 2023 च्या सुरुवातीच्या आधी बीसीसीआयने या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येत असलेल्या मैदानांची डागडुजी करुन घेतली आहे. यामध्ये दिल्लीबरोबरच भारतातील वेगवेगळ्या शहरांमधील मैदानांचा समावेश आहे. या नुतनीकरणावेळी मैदानामध्ये रोषणाईची सोयही करण्यात आली आहे. सामन्यादरम्यान अनेक मैदानांमध्ये लाल, निळ्या रंगाची रोषणाई पाहायला मिळते. अनेक सामन्यांनंतरही ही रोषणाई दिसून येते.
Arun Jaitley Stadium today's match lights show. #AUSvsNED pic.twitter.com/9hUutVNm93
— Sports Addict (AJ) (@AJpadhi) October 25, 2023
बऱ्याच सामन्यानंतर लेझर शो सारख्या गोष्टीही दिसून आल्या आहेत. मात्र या गोष्टी खेळाडूंसाठी चांगल्या नाहीत असं मॅक्सवेलने स्पष्टपणे सांगितलं आहे.