पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा भारताच्या बॅट्समननी निराशा केली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ११२/५ असा झाला आहे. दिवसाअखेर हनुमा विहारी २४ रनवर नाबाद तर ऋषभ पंत ९ रनवर नाबाद खेळत आहेत. या मॅचमध्ये जिंकण्यासाठी भारताला अजूनही १७५ रनची आवश्यकता आहे. पण भारताची ही अवस्था बघता ऑस्ट्रेलियाच ही मॅच पाचव्या दिवशी जिंकेल हे जवळपास स्पष्ट आहे.
ऑस्ट्रेलियानं या मॅचमध्ये भारताला विजयासाठी २८७ रनचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच धक्का बसला. ओपनर केएल राहुल शून्य रनवर आऊट झाला. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेला चेतेश्वर पुजारालाही ४ रनच करता आल्या. यानंतर विराट कोहली आणि मुरली विजयनं भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण नॅथन लायननं १७ रनवर विराट कोहलीचा बळी घेतला. नॅथन लायननं कोहलीपाठोपाठ मुरली विजयचीही २० रनवर शिकार केली. अजिंक्य रहाणे सर्वाधिक ३० रन करून आऊट झाला. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन आणि जॉस हेजलवूडनं सर्वाधिक २ विकेट घेतल्या. मिचेल स्टार्कला १ विकेट घेण्यात यश आलं.
तत्पूर्वी चौथ्या दिवसाची सुरुवात १३२/४ अशी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय बॉलरनी मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. २४३ रनवर ऑस्ट्रेलियाची टीम ऑल आऊट झाली. फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं सर्वाधिक ६ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहला ३ आणि ईशांत शर्माला १ विकेट मिळाली.
४ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारत १-०नं आघाडीवर आहे. ऍडलेडमध्ये झालेली पहिली टेस्ट मॅच भारतानं ३१ रननं जिंकली होती.