Babar Azam Talks About Tweet For Virat Kohli: भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) 2022 मध्ये लय सापडत नव्हती म्हणून त्याच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. विराटचं आयपीएलचं (IPL) सीजनही फारसं छान गेलं नाही किंवा त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही सातत्याने अपयश येत होतं. त्याला नावाला साजेशी कामगिरी करता येत नव्हती. तो फारच कमी धावा करुन बाद होत होता. जुलै महिन्यामध्ये बारत आणि इंग्लंडदरम्यानच्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहलीने 6 आठवड्यांचा ब्रेक घेतला होता. आशिया चषक स्पर्धेमधून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता. या सामन्यामध्येच विराटला लय गवसली. त्यानंतर विराट सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र विराटच्या या बॅड पॅचदरम्यान पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने (Pakistan Skipper Babar Azam) विराट कोहलीसाठी एक खास ट्वीट केलं होतं. बाबरने आता हे ट्वीट नेमकं का केलं होतं यासंदर्भातील खुलासा केला आहे.
भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना विराटला धावा करण्यात अपयश येत होतं. त्यावेळी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराने एक ट्वीट केलं होतं. हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाला होते. त्यावेळेस बाबर (Babar Azam) हा सर्वच फॉर्ममध्ये उत्तम कामगिरी करत होता. 14 जुलै रोजी बाबरने ट्विटरवरुन आपल्या भाना व्यक्त करताना विराटसाठी एक संदेश दिला होता. बाबरने, "हा वेळ सुद्धा निघून जाईल. खंबीरपणे उभा राहा," असं विराटला म्हटलं होतं.
This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022
विराटनेही बाबरच्या या ट्वीटला रिप्लाय दिला होता. त्याने बाबरचं कौतुक करतानाच त्याच्या या शुभेच्छाही स्वीकारल्या होत्या. "धन्यवाद. चमकत राहा आणि पुढे चालत राहा. तुलाही शुभेच्छा," असं विराट म्हणाला होता. बाबरने विराटसाठी केलेल्या या ट्वीटची क्रिकेट जगतामध्ये चांगलीच चर्चा होती. आता सहा महिन्यांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतर बाबरने कोहलीसाठी केलेल्या या ट्वीटबद्दल खुलासा केला आहे.
Thank you. Keep shining and rising. Wish you all the best
— Virat Kohli (@imVkohli) July 16, 2022
'आयसीसी डिजिटल इनसाइडर'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बाबरने, "एक खेळाडू म्हणून कोणीही अशा बॅड पॅचमधून जाऊ शकतो. त्यावेळी मी विचार केला की मी ट्विट केलं तर कदाचित त्यामुळे कोणाला तरी मदत आणि विश्वास मिळू शकेल. एक खेळाडू म्हणून तुम्ही प्रत्येक खेळाडूच्या वाईट काळामध्ये त्याला सोबत करण्याचा प्रयत्न करता," असं विराटसाठी केलेल्या ट्वीटबद्दल म्हटलं आहे. "कठीण कालावधीमध्ये तुम्हाला समजतं की तुम्ही इतरांबद्दल काय विचार करता. त्यावेळी मी विचार केला की मी असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे कदाचित काहीतरी सकारात्मक घडेल. काहीतरी असं करण्याचा विचार होता जी कृती प्लस पॉइण्ट ठरेल," असं बाबर म्हणाला.
2022 च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये दमदार पुनरागमन करणाऱ्या विराटने 2023 च्या सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी कायम ठेवली आहे. यंदाच्या वर्षी खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये एका दिवसीय क्रिकेटमध्ये 2 शतकं विराटने झळकावली आहेत. विराटच्या या सातत्यापूर्ण कामगिरीचा भारताला आयसीसी ओडीआय वर्ल्ड कपमध्ये फायदा होईल अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे.