आता स्थानिक क्रिकेटपटूही होणार मालमाल, BCCI ने केली मोठी घोषणा

देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे

Updated: Sep 20, 2021, 06:36 PM IST
आता स्थानिक क्रिकेटपटूही होणार मालमाल, BCCI ने केली मोठी घोषणा

मुंबई : देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज एक मोठी घोषणा केली आहे. स्थानिक क्रिकेटपटूंच्या (Domestic Cricketers) मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ज्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये 40 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत, त्यांच्या मॅच फीमध्ये 60 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

त्याचबरोबर 23 वर्षांखालील खेळाडूंच्या मॅच फीमध्ये 25 हजार आणि 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये 20 हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय स्थानिक क्रिकेटपटूंना मागील मोसमाचीही भरपाई दिली जाईल. गेल्या वर्षी रणजी ट्रॉफी कोरोनामुळे रद्द झाली होती. यासाठी बोर्डातर्फे सर्व क्रिकेटपटूंना मॅच फीच्या 50 टक्के नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

सध्या, रणजी करंडकातील (Ranji Trophy) एका खेळाडूला 35,000 रुपये आणि 1.4 लाख रुपये प्रत्येक सामन्यासाठी शुल्क दिलं जातं. 

2019-20 देशांतर्गत हंगामात सहभागी होणाऱ्या क्रिकेटपटूंना कोविड -19 मुळे रद्द झालेल्या 2020-21 हंगामाची भरपाई म्हणून 50 टक्के अतिरिक्त सामना शुल्क मिळेल, असं ट्विटही जय शहा यांनी केलं आहे. 

याशिवाय, मॅच फी वाढीची घोषणा करताना त्यांनी म्हटलंय, 'देशांतर्गत क्रिकेटपटूंसाठी मॅच फी वाढीची घोषणा करताना मला आनंद होत आहे. वरिष्ठ खेळाडूंना 60,000 रुपये (40 सामन्यांपेक्षा जास्त), 23 वर्षांखालील खेळाडूंना 25,000 हजार रुपये आणि 19 वर्षांखालील खेळाडूंना 20,000 हजार रुपये मिळतील असं ट्विट जय शहा यांनी केलं आहे.

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा 21 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा सुरु होणार आहे.