Virat Kohli च्या कर्णधारपदावर बीसीसीआय नाखूश? हा खेळाडू होऊ शकतो कर्णधार

टी-20 विश्वचषक स्पर्धा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे

Updated: Sep 10, 2021, 10:33 PM IST
Virat Kohli च्या कर्णधारपदावर बीसीसीआय नाखूश? हा खेळाडू होऊ शकतो कर्णधार title=

मुंबई : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (T-20 WORLD CUP 2021) भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. पंधरा खेळाडूंच्या या संघात काही नविन खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंबरोबरच ही स्पर्धा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohali) याच्यासाठी महत्वाची आणि तितकीच आव्हानात्मक असणार आहे. कारण टी-20 विश्वचषकाचं जेतेपद पटकावण्यात भारतीय संघ अपयशी ठरला तर विराट कोहलीचं मर्यादित षटकांचं कर्णधारपद काढलं जाऊ शकतं.

विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी झाला आहे पण त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे मर्यादित षटकांच्या संघाचं नेतृत्व भारतीय संघाचा धडाकेबाज बॅट्समन हिटमॅन रोहित शर्माकडे (Rohit Sharma) जाऊ शकतं.

कर्णधारपद वाचवण्याची अखेरची संधी?

CricketAddict.com च्या अहवालानुसार, टीम इंडियाचा कर्णधार कोहलीला आगामी टी -20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना आपलं कर्णधारपद वाचवण्याची शेवटची संधी असू शकते. एक मजबूत संघ असूनही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात कोहलीला अपयश आलं आहे. त्यामुळे रोहिम शर्माच्या नावाची शक्यता वर्तवली जात आहे.

टी-20 विश्वचषकानंतर होऊ शकतो निर्णय?

सूत्रांच्या माहितीनुसार बीसीसीआय (BCCI) कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल खूप चिंतित आहे, विशेषत: आयसीसी स्पर्धांमध्ये तो कर्णधार म्हणून अपयशी ठरला आहे. WTC फायनलनंतर जुलैमध्ये झालेल्या बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेक अधिकारी कोहलीच्या कर्णधारपदावर समाधानी नव्हते.

या बैठकीला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह आणि कोषाध्यक्ष अरुण धुमाळ उपस्थित होते. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये दोन फिरकीपटूंसोबत खेळण्याचा निर्णय बीसीसीआयच्या अधिकार्‍यांना योग्य वाटला नव्हता, आणि म्हणूनच टी -20 विश्वचषक कोहलीची शेवटची संधी असू शकते. 

कोहलीकडे कसोटी कर्णधार आणि रोहित शर्मा मर्यादित षटकांचा कर्णधारपद देण्यावर चर्चा झाली. रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) नेतृत्व करताना अभूतपूर्व यश मिळवलं आहे. त्यामुळे झटपट क्रिकेटसाठी रोहित शर्माचं नाव आघाडीवर आहे.