अखेर BCCIने उत्तर दिलंच! भारत-पाकिस्तान सामना होणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषक सामना रद्द करण्याची मागणी होतेय.

Updated: Oct 20, 2021, 11:03 AM IST
अखेर BCCIने उत्तर दिलंच! भारत-पाकिस्तान सामना होणार?

मुंबई : टी-20 वर्ल्डकप 2021ला 17 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. ज्यामध्ये भारताला 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. परंतु हा सामना खेळवला जाणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये भारतीय नागरिकांवर वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषक सामना रद्द करण्याची मागणी होतेय.

पाकिस्तानशी खेळणार नाही भारत?

यावर्षी टी -20 वर्ल्डकप जिंकण्यासाठी आणि पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यासाठी भारताला प्रबळ दावेदार मानलं जातं. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम खूप चांगला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 5 सामने झाले असून त्यापैकी टीम इंडियाने सर्व पाच सामने जिंकले आहेत. परंतु हा सामना रद्द झाला, तर ते क्रिकेट चाहत्यांसाठी खूप वाईट स्वप्न सिद्ध होईल.

BCCIने जाहीर केलं मोठं अपडेट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 वर्ल्डकप सामन्याबाबत बीसीसीआयने एक मोठे अपडेट जारी केलं आहे. आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय कमिटमेंट्समुळे हा उच्च व्होल्टेज सामना रद्द केला जाऊ शकत नाही, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं आहे. 

राजीव शुक्ला एएनआयशी बोलताना म्हणाले, "आम्ही जम्मू -काश्मीरमधील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा प्रश्न आहे, आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय कमिटमेंट्समुळे आम्ही खेळण्यास नकार देऊ शकत नाही."

भविष्यात होणार भारत-पाक सामना?

राजीव शुक्ला पुढे म्हणाले, तुम्हाला आयसीसी स्पर्धांमध्ये संघांविरुद्ध खेळावं लागेल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 वर्ल्डकप सामना 24 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यातूनच टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपच्या मोहिमेला सुरुवात करेल.