मुंबई : श्रीलंकेविरूद्धच्या सिरीजमध्ये टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे वृद्धीमान साहा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसला. मग यामध्ये पत्रकाराने दिलेली धमकी असो किंवा त्याने राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्याविरूद्ध केलेलं विधान असो... मात्र याचा फटका आता साहाला बसणार आहे. BCCI आता वृद्धीमान साहाविरोधात सेंट्रल कान्ट्रॅक्टच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर मागणार आहे.
सेंट्रल कान्ट्रॅक्टसोबत असलेल्या खेळाडूंनी टीम सिलेक्शन संदर्भातील अनेक गुप्त गोष्टींना सार्वजनिक ठिकाणी मांडण्यास मनाई केली आहे. मात्र श्रीलंकेविरूद्धच्या टेस्ट टीमची निवड झाल्यानंतर साहाने मॅनेजमेंट कोच राहुल द्रविड आणि बीसीसीसआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत झालेला संवाद सर्वांसोबत आणला. यामुळे वादही निर्माण झाला. यासाठीच सेंट्रल कान्ट्रॅक्टच्या नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपांचं उत्तर त्याच्याकडून मागण्यात आलंय.
वृद्धीमान साहा याचा कारारानुसार ग्रुप बी मध्ये समावेश होतो. यानुसार त्याने नियम 6.3 चं उल्लंघन केलं आहे. या नियमाअंतर्गत कोणताही खेळाडू खेळ, अधिकारी, खेळातील गोष्टी, निवडीच्या बाबी किंवा खेळाशी संबंधित इतर कोणत्याही बाबींबद्दल माध्यमात कोणत्याही प्रकारची टिप्पणी करू नये जी बीसीसीआयच्या मते हिताची नाहीये.
बोर्डाचे कोषाध्यक्ष अरूण धुमळ यांनी एका न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितलं की, सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट असतानाही सिलेक्शनसंदर्भातील मुद्दे पब्लिक फोरममध्ये कसे मांडले याबाबत विचारणा करण्यात येणार आहे.
एका वेबसाईटशी बोलताना साहाने दिग्गज खेळाडू आणि कोच राहुल द्रविड यांच्याबाबत मोठं विधान केलं होतं. सहाच्या म्हणण्यानुसार, कोच राहुल द्रविड यांनी त्याला निवृत्ती घेण्याबाबत सुचवलं होतं.
सहाने सांगितलं की, निवृत्तीचा विचार करण्यामागे राहुल द्रविड यांनी आता त्याचा सिलेक्शनसाठी विचार केला जाणार नसल्याचं कारण सांगितलं.