'शास्त्री-कोहली एकमेकांना पूरक; प्रशिक्षक बदलणं धोकादायक'

टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. 

Updated: Jul 25, 2019, 11:47 PM IST
'शास्त्री-कोहली एकमेकांना पूरक; प्रशिक्षक बदलणं धोकादायक' title=

मुंबई : टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. पण कर्णधार विराट कोहलीला पुढे न्यायला मदत करण्यासाठी रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून कायम राहणं गरजेचं आहे, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.

बीसीसीआयचा एक अधिकारी आयएनएसशी बोलताना म्हणाला, 'टीम बदलामधून जात असताना विराट आणि शास्त्री आपल्या पदावर राहणं महत्त्वाचं आहे, कारण २०२० साली टी-२० वर्ल्ड कप आहे. या स्पर्धेमध्ये टीम युवा खेळाडूंना संधी देणार आहे. शास्त्री आणि कोहली एकमेकांना पूरक आहेत. या यशस्वी टीमच्या अर्ध्या हिश्श्याला बदलणं योग्य ठरणार नाही.'

'टीममध्ये सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे. नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली, तर तो प्रशिक्षक आपल्या पद्धतीने सुरुवात करेल. बदलेला प्रशिक्षक टीममधलं समीकरण बिघडवण्यासही कारणीभूत ठरू शकतो. यावेळी बदल केला तर तो पुढच्या ५ वर्षांसाठी रणनिती आणि योजनेमध्ये बदल करण्यासारखं ठरेल,' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

३० जुलैपर्यंत इच्छुकांना बीसीसीआयकडे अर्ज द्यावा लागणार आहे. टीमचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अर्ज द्यायची गरज नाही. त्यांना मुलाखतीमध्ये थेट प्रवेश मिळेल. वर्ल्ड कप संपल्यानंतर रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा कार्यकाळ संपला होता. पण वेस्ट इंडिज दौऱ्यामुळे या सगळ्यांचा करार ४५ दिवसांनी वाढवण्यात आला.