भारतासाठी खुशखबर! पराभवाची जखम देणारा इंग्लंडचा खेळाडू बाहेर

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला.

Updated: Aug 5, 2018, 06:52 PM IST
भारतासाठी खुशखबर! पराभवाची जखम देणारा इंग्लंडचा खेळाडू बाहेर  title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. इंग्लंडनं ठेवलेल्या १९४ रनचा पाठलाग करणं भारतीय बॅट्समनना जमलं नाही. विराट कोहली सोडला तर या मॅचमध्ये एकाही बॅट्समनला यश मिळालं नाही. इंग्लंडकडून सॅम कुरेन आणि बेन स्टोक्स यांच्या जबरदस्त कामगिरीमुळे या मॅचमध्ये इंग्लंडचा ३१ रननी विजय झाला. यानंतर आता ९ ऑगस्टपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात दुसरी टेस्ट खेळवण्यात येणार आहे. या टेस्ट मॅचआधी भारताला खुशखबर मिळाली आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताला पराभवाची जखम देणारा बेन स्टोक्स या मॅचमध्ये खेळणार नाही.

बेन स्टोक्सवर सुरु असलेल्या केसमुळे तो दुसऱ्या टेस्टला मुकणार आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्रिस्टलच्या एका नाईट क्लबमध्ये स्टोक्सनं काही लोकांबरोबर हाणामारी केली होती. यानंतर स्टोक्सविरुद्ध केस सुरु आहे. या केसची सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे. या मारहाणीनंतर बराच काळ स्टोक्स इंग्लंड टीमच्या बाहेर होता.

भारताविरुद्धच्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये बेन स्टोक्सनं ४ विकेट घेतल्या होत्या. यामध्ये विराट कोहलीच्या महत्त्वाच्या विकेटचाही समावेश आहे. एकाच ओव्हरमध्ये स्टोक्सनं विराट आणि मोहम्मद शमीची विकेट घेतली. भारताच्या ९ विकेट गेल्यानंतर हार्दिक पांड्या उमेश यादवला घेऊन संघर्ष करत होता. पण बेन स्टोक्सनं हार्दिक पांड्याचीही विकेट घेऊन इंग्लंडला सामना जिंकवून दिला.

बेन स्टोक्सऐवजी क्रिस वोक्सची इंग्लंडच्या टीममध्ये निवड झाली आहे. दुखापतीमुळे क्रिस वोक्स इंग्लंड टीमच्या बाहेर होता. पण दुसऱ्या टेस्टआधी वोक्स फिट होईल अशी इंग्लंडच्या टीमला आशा आहे.