Sachin Tendulkar : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अपात्र ठरवण्यात आलं. 50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन वाढल्याचं कारण देत विनेशला ऑलिम्पिक संघटनेने अपात्र ठरवलं. आता विनेशने रौप्य पदकासाठी क्रीडा लवादाकडे (Court of Arbitration for Sport) दाद मागितली आहे. यादरम्यान भारतरत्न सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. विनेश फोगाट रौप्य पदकासाठी (Silver Medal) पात्र असल्याचं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. विनेश फोगाटसाठी सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.
सचिन तेंडुलकरची विनेशसाठी पोस्ट
सचिन तेंडुलकरने विनेश फोगाटसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने म्हटलंय 'प्रत्येक खेळाचे नियम असतात आणि ते नियम पाळले पाहिजेत, पण काही वेळा या नियमांवर पुनर्विचारही केला पाहिजे. विनेश फोगट अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. वजनाच्या आधारावर तिची अपात्रता अंतिम फेरीपूर्वी झाली होती. त्यामुळे तिच्याकडून रौप्य पदक काढून घेणे हे खेळभावनेच्या विरुद्ध आहे'.
विनेश रौप्य पदकासाठी पात्र
सचिनने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय ''कार्यक्षमता वाढवणाऱ्या औषधांच्या वापरासारख्या नैतिक उल्लंघनासाठी खेळाडूला अपात्र ठरवण्यात आले तर ते समजण्यासारखं आहे. अशावेळी त्या खेळाडूला कोणतंही पदक न देणं, किंवा शेवटच्या स्थानावर बसवणं हे योग्य ठरेल. पण विनेश फोगाटने प्रतिस्पर्ध्यांचा पराभवकर अंतिम फेरी गाठली. त्यामुळे रौप्य पदकासाठी नक्कीच पात्र आहे. आम्ही सर्व क्रीडा लवादाच्या न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. आपण प्रार्थना करूया की विनेशला न्याय मिळेल'
कधी येणार निर्णय?
कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट्स (CAS) म्हणजे क्रीडा लवादाने दिलेल्या माहितीनुसार विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याच्या निर्णयावर पॅरिस ऑलिम्पिक संपण्याआधी निर्णय येईल असं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार विनेशच्या याचिकेवर प्रक्रिया चालू आहे आणि केस डॉ. ॲनाबेले बेनेट यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.
विनेशने जाहीर केली निवृत्ती
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्यानंतर विनेश फोगाटने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 29 वर्षांच्या विनेशने निवृत्ती जाहीर करताना कुस्ती जिंकली, मी हरली, आई मला माफ कर, तुझं स्वप्न, माझी हिंमत सर्व तुटलं, आता माझ्यात ताकद नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन असं म्हटलं आहे.