'विराट-रोहितचं कितीही कौतुक केलं तरी BCCI च टीम इंडियाच्या यशासाठी कारणीभूत, कारण...'

Comment On BCCI Rohit Sharma Virat Kohli: विराट कोहली आणि रोहित शर्माचाही उल्लेख या क्रिकेटपटूने केला आहे. मात्र भारतीय संघाच्या यशाचं श्रेय त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 1, 2024, 03:18 PM IST
'विराट-रोहितचं कितीही कौतुक केलं तरी BCCI च टीम इंडियाच्या यशासाठी कारणीभूत, कारण...' title=
एका क्रिकेटपटूने हे विधान केलं आहे (प्रातिनिधिक फोटो)

Comment On BCCI Rohit Sharma Virat Kohli: भारतीय संघ मागील काही वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत असल्याबद्दल बांगलादेशच्या एका क्रिकेटपटूने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं कौतुक केलं आहे. बीसीसीआयचं कौतुक करणाऱ्या या खेळाडूचं नाव आहे बांगलादेशी फलंदाज तमीम इक्बाल! बीसीसीआयचा संदर्भ देत बांगलादेश क्रिकेट बोर्डाची वाटचालही मोठं यश मिळवण्याच्या दिशेनेच सुरु असल्याचा दावा तमीम इक्बालने केला आहे. 

बोर्डाने काळजी घेतली पाहिजे की...

खरं तर बांगलादेशच्या संघाने 2015 च्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या बादफेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर त्यांनी 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही चमकदार कामगिरी केली. मात्र आयसीसीच्या मागील काही स्पर्धांमध्ये बांगलादेशचा प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. याचसंदर्भात 'स्टारस्पोर्ट्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, तमीम इक्बालने क्रिकेट बोर्डांनीच त्यांचे संघ चांगल्या स्पर्धांमध्ये सहभागी होतील याची काळजी घेतली पाहिजे असं म्हटलं आहे.

विराट, रोहितचं हवं तेवढं कौतुक करु शकता मात्र...

"आपल्याला काय साध्य करायचं आहे याबद्दल उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची धोरणं स्पष्ट असली पाहिजेत. कर्णधाराला चषक जिंकायचा असतो. प्रशिक्षकाला चषक जिंकायचा असतो. मात्र प्रश्न हा असतो की क्रिकेट बोर्डालाही काय हवं आहे? भारताबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं हवं तेवढं कौतुक करु शकता. मात्र बीसीसीआय एवढी सक्षम नसती तर भारताला एवढं यश मिळवता आलं नसतं," असा दावा तमीमने केला आहे.

माझे मतभेद आहेत पण...

"यात पण बरेच जर तर असतील. बांगलादेश क्रिकेट बोर्डामध्ये एकूण तीन माजी कर्णधारांचा कारभारामध्ये समावेश आहे. आधीच्या समितीने काही चुकीचे निर्णय घेतले होते का? नाही, त्यांनीही बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या होत्या हे नाकारता येणार नाही. मला बोर्डातील दोन-तीन जणांशी काही खासगी अडचणी असतील. मात्र त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी काहीच केलं नाही. यावेळी तर अध्यक्षही क्रिकेटपटू आहे. त्यामुळे त्याला काही वेळ दिला पाहिजे आणि त्यानंतरच त्याच्या कामगिरीवर बोललं पाहिजे," असं तमिम म्हणाला. मागील महिन्यामध्ये पहिल्यांदाच बांगलादेशसाठी क्रिकेट खेळलेल्या व्यक्तीला बोर्डाचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. फारुख अहमद असं नव्या अध्यक्षाचं नाव आहे. 

भारताने कसोटी मालिका जिंकली

दरम्यान, भारताच्या दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशच्या संघाचा भारताने कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव केला आहे. भारताने चेन्नईपाठोपाठ कानपूर कसोटीही जिंकली आहे. भारताने कानपूर कसोटीचा अडीच दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतरही स्फोटक खेळी करत विजय मिळवल्याने भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.