टीम इंडियाचा 'आधारस्तंभ' चेतेश्वर पूजाराच्या शिरपेचात मानाचा तुरा

पुजाराने 90 धावा करत मोठ्या विक्रमाला घातली गवसणी 

Updated: Dec 15, 2022, 01:23 AM IST
टीम इंडियाचा 'आधारस्तंभ' चेतेश्वर पूजाराच्या शिरपेचात मानाचा तुरा  title=

Ind vs Ban : भारत आणि बांगलादेशमधील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली होती. मात्र सलामीवीर के. एल. राहुल आणि शुभमन गिल यांना मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरले. पहिली विकेट गेल्यावर चेतेश्वर पुजारा खेळायला आल्यावर त्याने सामन्याची सूत्रे हाती घेतली. पुजाराने 90 धावा करत विक्रमाला गवसणी घातली आहे. 

चेतेश्वर पुजाराने 90 धावा केल्या, भारताच्या एकीकडे विकेट पडत होत्या तर दुसरीकडे पुजाराने एक बाजू लावून धरली होती. किंग कोहली अवघ्या 1 धाव काढून बाद झाला. ऋषभ पंत सेट झाला असं वाटत असताना 42 धावांवर माघार परतला. पुजारा शतकाच्या जवळपास गेला होता मात्र शतकापासून वंचित राहिला.   

चेतेश्वर पुजाराने 203 चेंडूत 11 चौकारांसह 90 धावा केल्या तर अय्यरने 169 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 82 धावा केल्या. भारताने 112 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या पण पुजारा-अय्यर जोडीने 149 धावांची भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. पुजारा भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा 8वा खेळाडू बनला आहे. चेतेश्वर पुजाराने 97 सामन्यात 6882 धावा केल्या आहेत. दिलीप वेंगसरकर यांनी 116 कसोटी सामन्यांमध्ये 6868 धावा केल्या आहेत. 

दरम्यान, कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम 15921 धावांसह सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. दुसऱ्या स्थानी राहुल द्रविड, तिसऱ्या सुनिल गासवकर, चौथ्या स्थानी व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, पाचव्या स्थानी विरेंद्र सेहवाग, सहाव्या स्थानी विराट कोहली, सातव्या स्थानी सौरव गांगुली तर आता आठव्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा आला आहे.