मुंबई : आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळणारा ख्रिस गेल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या मोसमात ख्रिस गेलनं ४ मॅचमध्ये १५१च्या स्ट्राईक रेटनं २५२ रन केल्या आहेत. यामध्ये एका नाबाद शतकाचा आणि एका अर्धशतकाचाही समावेश आहे. पंजाबच्या टीमकडून खेळताना गेल खुश असला तरी बंगळुरूच्या टीमनं आपल्यावर बोली लावली नसल्याचं दु:खही त्यानं बोलून दाखवलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये गेलनं हे वक्तव्य केलं आहे. कॅरेबिअन प्रिमिअर लीग(सीपीएल) आणि बांगलादेश प्रिमिअर लीग(बीपीएल)मध्ये गेलनं शानदार प्रदर्शन केलं होतं. बीपीएलमध्ये गेलनं ४८५ रन आणि सीपीएलमध्ये ३७६ रन केले होते.
या दोन्ही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर मला बंगळुरूच्या टीमकडून फोन आला. तुला बंगळुरूच्या टीममध्ये घ्यायचं आहे म्हणून आम्ही तुला रिटेन करू असं आश्वासन त्यांनी मला दिलं होतं पण यानंतर त्यांचा पुन्हा कधीच फोन आला नाही. नंतर कधीच फोन न आल्यामुळे बंगळुरूला मला टीममध्ये घ्यायचं नसल्याचं लक्षात आल्याचं गेल म्हणाला.
या निर्णयामुळे मी कोणाशीच भांडू शकत नाही. बीपीएल आणि सीपीएलमध्ये मी शानदार प्रदर्शन केलं होतं. आयपीएलमध्येही माझी कामगिरी चांगलीच होती. आकडे कधीच खोटं बोलत नाहीत. २१ अर्धशतकं, सर्वाधिक सिक्स एवढं सगळं मला सिद्ध करण्यासाठी पुरेसं नसेल तर मी काय करायला पाहिजे ते मला माहित नाही, अशी प्रतिक्रिया गेलनं दिली आहे. बंगळुरूच्या टीमची मी सगळ्यात मोठी ताकद होतो. त्यांनी पहिले फोन करूनही मला टीममध्ये घेतलं नाही म्हणून मी नाराज होतो. तो क्षण मला हैराण करणारा होता, अशी कबुली गेलनं दिली.
पंजाबनं मला संधी दिल्यामुळे खुश असल्याचं गेल म्हणाला. सुरुवातीला कोणत्याच टीमनं माझ्यावर बोली न लावल्यामुळे मला सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटले. पण पंजाबकडून खेळण्याचं माझ्या नशिबात होतं, असं वक्तव्य गेलनं केलं आहे.
आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी लावलेल्या लिलावामध्ये सुरुवातीला ख्रिस गेलवर कोणत्याही टीमनंबोली लावली नाही. दुसऱ्या दिवशीही गेलला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही. अखेर तिसऱ्यांदा बोली लागल्यावर पंजाबनं त्याला २ कोटी रुपयांना विकत घेतलं.