'हा खेळाडू होईल पुढचा विराट'; क्रिस गेलचं भाकीत

'यूनिव्हर्स बॉस' क्रिस गेलने भारतीय क्रिकेटबद्दल महत्त्वाचं भाकीत केलं आहे.

Updated: Apr 30, 2019, 05:09 PM IST
'हा खेळाडू होईल पुढचा विराट'; क्रिस गेलचं भाकीत title=

मुंबई : 'यूनिव्हर्स बॉस' क्रिस गेलने भारतीय क्रिकेटबद्दल महत्त्वाचं भाकीत केलं आहे. लोकेश राहुलमध्ये विराट कोहलीच्या कामगिरीची बरोबरी करण्याची क्षमता आहे, असं गेल म्हणाला आहे. लोकेश राहुल आणि क्रिस गेल हे सध्या आयपीएलमध्ये पंजाबच्या टीममधून खेळत आहेत. 'जेव्हा तुम्ही भारतीय बॅट्समनबद्दल बोलता तेव्हा राहुलचं नाव माझ्यासमोर येतं. राहुल विराटसारखा शानदार खेळाडू बनवा, अशी माझी इच्छा आहे. विराटनंतर राहुलने भारतीय टीमची जबाबदारी उचलली पाहिजे', असं वक्तव्य गेलने केलं.

केएल राहुल हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या वादातून नुकताच बाहेर पडला आहे. काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात राहुलची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. तसंच कॉफी विथ करण शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुलचं निलंबनही करण्यात आलं होतं. हा सगळा वाद शमल्यानंतर राहुल पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. आयपीएलमध्ये राहुल चांगली कामगिरी करत आहे.

'केएल राहुलने कारण नसताना दबाव घेऊ नये. त्याने स्वत:वर विश्वास ठेवावा आणि कोणत्याही प्रकारच्या प्रतिस्पर्धेमध्ये अडकू नये', असा सल्लाही गेलने दिला आहे. 'भारतामध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमी नाही. बहुतेक खेळाडूंना खेळण्याचीही संधी मिळत नाही', असं गेल म्हणाला.

यंदाच्या आयपीएल मोसमात राहुलने १२ मॅचमध्ये ५७.७७ची सरासरी आणि १३१.६४ च्या स्ट्राईक रेटने ५२० रन केल्या आहेत. यावेळी सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर या यादीमध्ये क्रिस गेल पाचव्या क्रमांकावर आहे. गेलने ११ मॅचमध्ये ४४.८० च्या सरासरीने आणि १६१.७३ च्या स्ट्राईक रेटने ४४८ रन केले आहेत.