पंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत शोएब अख्तर म्हणाला...

कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला.

Updated: Apr 27, 2020, 07:56 PM IST
पंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत शोएब अख्तर म्हणाला... title=

मुंबई : कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने कौतुक केलं आहे. हॅलो ऍपवर शोएब अख्तरने एक व्हिडिओ शेयर केला आहे. लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये या निर्णयाची गरज होती, असं शोएब अख्तर म्हणाला आहे. 

याआधी शोएब अख्तरने कोरोनाचा सामना करताना निधी उभारण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात ३ वनडे मॅचची सीरिज खेळवण्यात यावी, अशी मागणी केली होती. भारत-पाकिस्तान सीरिजमधून मिळणारा पैसा दोन्ही देशांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी वापरावा, असा प्रस्ताव शोएब अख्तरने ठेवला होता. शोएब अख्तरच्या या प्रस्तावावर भारताच्या माजी खेळाडूंनी टीका केली होती. 

भारताला पैशांची गरज नाही, आमच्याकडे बराच पैसा आहे, असं कपिल देव म्हणाले होते. कपिल देव यांच्या टीकेला शोएबने प्रत्युत्तर दिलं होतं. कपिल देव यांना पैशांची गरज नसली तरी इतरांना पैशांची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शोएबने दिली होती. 

एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडणं शक्य आहे, पण भारत-पाकिस्तान सीरिज सध्या शक्य नाही, असं सुनिल गावसकर म्हणाले होते. गावसकर यांच्या या वक्तव्यावरही शोएब बोलला होता. लाहोरमध्ये बर्फ पडल्याचा एक फोटो शोएबने ट्विट केला होता. मागच्यावर्षी लाहोरमध्ये बर्फ पडला, सनी भाई कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असं शोएब या ट्विटमध्ये म्हणाला होता.

शोएब अख्तरने पाकिस्तानकडून खेळताना ४६ टेस्टमध्ये १७८ विकेट, १६३ वनडेमध्ये २४७ विकेट आणि १५ टी-२०मध्ये १९ विकेट घेतल्या होत्या.