Asia Cup 2023 : एशिया कप 2023 स्पर्धा येत्या सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानात (Pakistan) खेळवली जाणार आहे. पण या स्पर्धेबाबत बीसीसीआयने (BCCI) कठोर भूमिका घेतली आहे. टीम इंडिया (Team India) पाकिस्तानातून जाऊन खेळणार नाही असं बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एशिया कप (Asia Cup 2023) स्पर्धा कुठे खेळवणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. यादरम्यान या स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्पर्धेतून पाकिस्तान क्रिकेट संघाच बाहेर पडू शकतो.
स्पर्धा पाकिस्तानात नाही?
एशिया कप 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट बोर्डासमोर (BCCI) हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला आहे. पण बीसीसीआयने हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. बीसीसीआयच्या भूमिकेला श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही पाठिंबा दिला आहे. अशात पाकिस्तानात एशिया कप स्पर्धा रद्द झाली तर बांगलादेश किंवा श्रीलंकेत ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते. दुसरीकडे हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव बीसीसीआयने स्विकारला नाही तर पाकिस्तान संघ एशिया कप स्पर्धेत खेळणार नाही, असं पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटलं आहे.
2008 पासून पाक दौरा नाही
भारतीय क्रिकेट संघ 2008 पासून पाकिस्तानात क्रिकेट खेळलेला नाही. 2008 मध्ये एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ शेवटचा पाकिस्तान संघ दौऱ्यावर गेला होता. तर 2012 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये शेवटची क्रिकेट मालिका खेळली गेली. बाइलेटरल मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन टी20 आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले होते. गेल्या काही काळात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडिज आणि श्रीलंकेने पाकिस्तान दौरा केला आहे. अशाच टीम इंडियादेखील एशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तान दौरा करेल अशी शक्यता वर्तवली जात होती.
त्रयस्थ ठिकाणी सामने?
एशिया कप 2022चं आयोजन श्रीलंकेत करण्यात आलं होतं. पण त्यावेळी तिथली राजकीय परिस्थिती बिघडली आणि स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात आली. युएईमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत श्रीलंकेने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करुन एशिया कपचं जेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे यंदाची एशिया कप स्पर्धाही त्रयस्थ ठिकाणी खेळवावी अशी मागणी बीसीसीआयने केली आहे. यंदाची एशिया कप स्पर्धा 50 ओव्हरच्या फॉर्मेटमध्ये खेळवली जाणार आहे.