राजकोट कसोटीत या दोन खेळाडूंचं पदार्पण? अशी असणार टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन

IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात भारताकडून दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 13, 2024, 03:18 PM IST
राजकोट कसोटीत या दोन खेळाडूंचं पदार्पण? अशी असणार टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन title=

India Playing 11 For 3rd Test: भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जातआहे. पहिल्या दोन सामन्यात भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहे. आता तिसरा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारत-इंग्लंडदरम्यानचा तिसरा कसोटी (India England Test) सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया 11 फेब्रुवारीला राजकोटमध्ये दाखल झाली. तर 12 फेब्रुवारीला इंग्लंडचा संघ आबूधाबीवरून राजकोटमध्ये पोहोचला. पण तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. स्टार फलंदाज केएल राहुल तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळ तो हा सामना खेळू शकणार नाही. 

दोन खेळाडू करणार पदार्पण
राजकोट कसोटी सामन्यात भारताकडून दोन युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे. फलंदाज सर्फराज खान (Sarfaraz Khan) आणि विकेटकिपर ध्रुव जुरेल (Druv Jurel) यांना तिसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही सामन्यात विकेटकिपर केएस भरतला अनेकवेळा संधी देऊनही त्याला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे जुरेलचा मार्ग मोकळा झाला आहे. तर केएल राहुल बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी सर्फराज खानला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण भारताच्या पंधरा खेळाडूंच्या संघात देवदत्त पड्डीकलचाही समावेश करण्यता आला आहे. त्यामुळे सर्फराज खान किंवा देवदत्त पड्डीकल यापैकी एकाला केएल राहुलच्या जागी संधी मिळेल. 

केएस भरत ठरतोय अपयशी
फलंदाज-विकेटकिपर केएस भरत सातत्याने अपयशी ठरत आहे. हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात केएस भरतने 41 तर दुसऱ्या डावात 28 धावा केल्या. यात त्याने दोन झेलही टीपले. तर विशाखापट्टनम कसोटीच्या पहिल्या डावात 17 आणि दुसऱ्या डावात केवळ 7 धावा केल्या. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात केएस भरतला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

बुमराहला विश्रांती मिळणार
राजकोटची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी आहे. त्यामुळे टीम इंडियात तीन फिरकी गोलंदाजांना खेळवलं जाईल. तर टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या सामन्यासाठी विश्रांती देण्याची शक्यता आहे. बुमराह चौथ्या कसोटीतही खेळणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. टीम इंडियात अनुभवी आर अश्विन, ऑलराऊंडर अक्षर पटेल आणि चायनामल कुलदीप यादव फिरकीची जबाबदारी सांभाळतील. तर मुकेश कुमार आणि मोहम्मद सिराजवर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. 

तिसऱ्या कसोटीसाठी संभाव्य भारतीय संघ
 रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज.