IND vs ENG: भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धर्मशाला (DharamShala) इथं खेळवला जाणार आहे. येत्या गुरुवारपासून म्हणजे 7 मार्चपासून कसोटी सामन्याला सुरुवात होईल. भारतीय पाच कसोटी सामन्यांची ही मालिका आधीच 3-1 अशी जिंकली आहे. आता पाचवा कसोटी सामना जिंकात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) आपली स्तिथी आणखी भक्कम करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये (Team India Palying XI) काही बदल होण्याची शक्यता आहे.
प्लेईंग XI मध्ये बदल होणार
धर्मशाला कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल अपेक्षितआहेत. टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) रांची म्हणजे चौथ्या कसोटी सामन्यातून आराम देण्यात आला होता. पण पाचव्या कसोटी सामन्यात बुमराहचं संघात पुनरागमन होईल. दुखापतग्रस्त केएल राहुलच्या जागी संघात संधी मिळालेल्या रजत पाटीदारला संधीचं सोनं करता आलं नाही. रजत पाटीदारला तीन सामन्यात केवळ 63 धावा करता आल्या आहेत. यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे फक्त 32. त्यामुळे पाचव्या कसोटीत रजत पाटीदारला संघात कितपत संधी मिळेल याबाबत साशंकता आहे. पाचव्या कसोटीत केएल राहुलच्या पुनरागमनाची शक्यता आहे. पण सध्या तो लंडनमध्ये उपचार घेतोय.
पाचव्या कसोटीसाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या पंधरा खेळाडूंच्या स्क्वॉडमध्ये युवा आक्रमक फलंदाज रिंकू सिंगलाही संधी दिली आहे. इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर देण्यासाठी रिंकू सिंगची संघात वर्णी लागू शकते. चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराहच्या जागी संधी मिळालेल्या आकाश दीपने दमदार कामगिरी केलीय. रांची कसोटी त्याने पहिल्या डावातच तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज या मालिकेत खास कामगिरी करु शकलेला नाही. पण यानंतरही मोहम्मद सिराजची संघातील जागा कायम राहू शकते. तर चांगल्या कामगिरीनंतरही आकाश दीपला बेंचवर बसावं लागण्याची शक्यता आहे.
विकेटकिपरची जबाबदारी युवा ध्रुव जुरेलवरच असेल. रांची कसोटी विजयात ध्रुव जुरेलने मोलाची भूमिका बजावली होती. पहिल्या डावात त्याने 90 तर दुसऱ्या डावात 39 धावा करत ध्रुवने इंग्लंडच्या हातातून विजय खेचून आणला होता. याशिवाय सर्फराज खानची जागाही निश्चित असेल.
इंग्लंड संघातही बदल
दुसरीकडे इंग्लंड संघाने चौथ्या कसोटीसाठी संघात दोन बदल केलो होते. ओली रॉबिन्सन आणि शोएब बशीर यांचं संघात पुनरागमन झालं होतं. पण रॉबिन्सन सध्या कमरेच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीत त्याला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. रॉबिन्सनच्या जागी मार्क वूडला संधी मिळू शकते.
पाचव्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, सरफराज खान, रवीन्द्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, शोएब बशीर, जेम्स एंडरसन