IND vs SL 1st ODI : टी20 मालिका विजयानंतर आता टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी (Ind vs Sri Lanka ODI Series) सज्ज झालीय. भारत आणि श्रीलंकादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार असून मालिकेतला पहिला सामना शुक्रवारी म्हणजे 2 ऑगस्टला रंगणार आहे. या मालिकेतून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) संघात पुनरागमन करतायत. टी20 वर्ल्ड कप विजयानंतर सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. या मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) धुरा पु्न्हा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.
रोहितला खुणावतोय हा विक्रम
पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा राहुल द्रविड आणि एमएस धोनीचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम मोडू शकतो. रोहित शर्माच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 10709 धावांची नोंद आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने 65 धावा केल्यास तो धोनीला मागे टाकू शकोत. धोनीच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10773 धावा आहेत. द्रविडचा विक्रम मोडण्यासाठी मात्र रोहित शर्माला मोठी धावसंख्या करावी लागेल. या सामन्यात रोहितला 181 धावांची खेळी करावी लागेल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडच्या नावावर 10889 धावा आहेत.
षटकारांचा विक्रम
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा तीन षटकार मारण्यास यशस्वी झाला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणार कर्णधार म्हणून त्याची नोंद होईल. कर्णधार म्हणून रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 231 षटकार ठोकले आहेत. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम इंग्लंडच्या इयान मॉर्गेनच्या नावावर आहे. मॉर्गेनने 233 षटकार मारलेत.
श्रीलंकेविरुद्ध शतकी सामना
श्रीलंकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना टीम इंडियासाठी आणखी एका कारणाने महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकल्यास टीम इंडियाच्या नावावर श्रीलंकेविरुद्ध 100 एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम जमा होणार आहे. भारत आणि श्रीलंकादरम्यान आतापर्यंत 168 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी 99 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या संघाविरुद्ध 100 एकदिवसीय सामने जिंकणारा टीम इंडिया पहिला संघ ठरु शकतो.
या यादीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध 142 सामन्यांपैकी 96 सामन्यात विजय मिळवलाय. तर पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध 157 सामन्यात 93 विजय मिळवले आहेत.