T20 World Cup: या खेळाडूला संघात मिळाले नाही स्थान, आता कर्णधारपद भूषवताना न्यूझीलंडला दिला दे धक्का

 IND A vs NZ A: चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात, इंडिया ब्लूजने 284 धावा केल्या, त्यानंतर न्यूझीलंड A संघ 38.3 षटकात 178 धावांवर सर्वबाद झाला. यासह भारत अ संघाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली.

Updated: Sep 28, 2022, 10:26 AM IST
T20 World Cup: या खेळाडूला संघात मिळाले नाही स्थान, आता कर्णधारपद भूषवताना न्यूझीलंडला दिला दे धक्का title=

Sanju Samson, IND A vs NZ A Series : भारत A संघाने मालिकेतील तिसर्‍या  एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड A संघाचा 106 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करुन चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा मोठा पराक्रम केला. इंडिया ब्लूजने 284 धावा केल्यानंतर न्यूझीलंड अ संघ 38.3 षटकात 178 धावांवर गुंडाळला गेला. यासह भारत अ संघाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली.   

चेन्नईचा सॅमसन चमकला

चेन्नईत खेळल्या गेलेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात संजू सॅमसन याने शानदार फलंदाजी केली. त्याने संघासाठी सर्वाधिक 54 धावांचे योगदान दिले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सॅमसनने 68 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्यांच्याशिवाय तिलक वर्मा (50) आणि शार्दुल ठाकूर (51) यांनीही अर्धशतके झळकावली. टिळक आणि सॅमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. शार्दुलने 33 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकार ठोकले. न्यूझीलंड अ संघाकडून जेकब डफी, मॅथ्यू फिशर आणि मायकेल रिपन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. 

क्लीव्हरच्या सर्वाधिक 83 धावा

न्यूझीलंड अ संघाकडून सलामीवीर डेन क्लीव्हरने सर्वाधिक 83 धावा केल्या. विशेष म्हणजे तो या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा ठरला पण त्याचा संघ 180 धावांचा टप्पाही पार करू शकला नाही. क्लीव्हरने 89 चेंडू खेळले आणि 9 चौकार, 2 षटकार मारले. भारतीय संघाकडून राज बावाने 11 धावांत चार बळी घेतले. त्यांच्याशिवाय राहुल चहर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

सॅमसनला T20 विश्वचषक संघात स्थान नाही

आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत भारतासाठी एकूण 23 सामने खेळणाऱ्या संजू सॅमसन याला आगामी टी-20 विश्वचषकासाठी संघात स्थान मिळालेले नाही. 2015मध्ये त्याने या फॉरमॅटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, परंतु तेव्हापासून तो केवळ 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला आहे. या जागतिक स्पर्धेसाठी भारताने दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांचा यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश केला आहे.