मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वात आपल्या अनोख्या शैलीने क्रीडारसिकांची मनं जिंकणारा महेंद्रसिंग आंततराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने यशशिखरावर पोहोचला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळापासूनच धोनीच्या वाट्याला आलेली प्रत्येक जबाबदारी त्याने लिलया पेलली. मग ते टी२०साठी भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवणं असो, यष्टीरक्षण करणं असो किंवा मग संघासाठी दमदार खेळी खेळणं असो. इतकच नव्हे तर, संघात वरिष्ठ खेळाडूंची भरणा असतानाही त्याच्यावर ज्यावेळी एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली तेव्हाही त्याने जबाबदारी घेत संघाला एकसंध ठेवण्याचं सुरेख काम केलं.
परिणामी, धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले. कोणत्याकी क्रिकेट मालिकेत किंवा सामन्यात संघ विजयी ठरल्यानंतर जेतेपदासाठी मिळणारं चषक स्वीकारत धोनी ते संघातील खेळाडूंच्या हाती देतो, प्रत्येक खेळाडूचं कौतुक करतो. धोनीची हीच शैली त्याला सर्वार्थाने एक यशस्वी आणि परिपूर्ण खेळाडू ठरवते. त्याच्या अशाच आणखी एका गुणाविषयी भारतीय क्रिकेट संघाच्या माजी mental conditioning coach असणाऱ्या Paddy Upton यांनी खुलासा केला आहे.
'बेअरफूट' या पुस्तकाच त्यांनी ही बाब सर्वांसमोर आणली आहे. धोनीची खरी ताकद म्हणजे संयम आणि त्याचा शांत स्वभाव. त्याच्या याच स्वभावामुळे इतरही खेळाडूंना तणावाच्या परिस्थितीचा सामना करण्याची प्रेरणा मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. धोनीचा हाच गुण सांगत त्यांनी आणखी एका गोष्टीचाही खुलासा केला आहे. ज्यामध्ये चक्क धोनीने संघातील खेळाडूंसाठी दिलेल्या शिक्षेचाही उल्लेख करण्यात आला आहे.
काय होती ती शिक्षा?
संघातील प्रत्येक खेळाडूला वेळेचं महत्त्वं माहिती करुन देण्यासाठी त्याने एक वेगळीच शक्कल लढवल्याचा उलगडा Paddy Upton यांनी पुस्तकात केला. सामन्यासाठीच्या सरावासाठी उशिरा येणाऱ्या खेळाडूकडून दंड आकारण्याची सुरुवात अनिल कुंबळेने केली होती. पण, धोनीने याला थोडं वेगळंच वळण दिलं होतं. याविषयी माहिती देत Paddy Upton लिहितात, 'मी ज्यावेळी संघाशी जोडलो गेलो, तेव्हा अनि कुंबळेकडे कसोटी संघाचं कर्णधार पद होतं, तर धोनी एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. स्वत:चच परीक्षण करण्यासाठी म्हणून संघाला विचारण्यात आलं, सराव आणि मिटिंगसाठी सर्वांनी वेळेवर येण्याची गरज आहे का? यावर सर्वांनीच होकारार्थी उत्तर दिलं. उशिरा येणाऱ्याने काय द्यावं? याच्याही चर्चा झाल्या. शेवटी हा निर्णय कर्णधारावरच सोपवण्यात आला '.
सरावासाठी उशिरा येणाऱ्या खेळाडूने शिक्षा म्हणून १० हजार रुपयांचा दंड द्यावा असा निर्णय अनिल कुंबळेने घेतला. तर, धोनीने या शिक्षेला वेगळ्याच प्रकारे सर्वांसमोर ठेवलं. 'हो शिक्षा तर दिली पाहिजेच. त्यामुळे जर एकाही खेळाडूला उशिर झाला तरीही संपूर्ण संघातील खेळाडूंनाही त्याच्या चुकीसाठी दहा हजारांचा दंड भरावा लागणार अशी शिक्षा त्याने दिली. त्या दिवसापासून एकदिवसीय क्रिकेट संघात सरावासाठी कोणताही खेळाडू उशिरा आला नाही', हा महत्त्वाचा उलगडा त्यांनी केला. संघातील खेळाडूंना वठणीवर आणण्यासाठी धोनीने लढवलेली ही शक्कल पाहता, त्याचं कौतुक करावं तितकं कमीच.