IND vs SL T20 Series Happy Retirement : लंका दौऱ्यात तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) यजमान श्रीलंकेला क्लीन स्विप दिला. या मालिका विजयाने टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि टीम इंडियाचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी आपल्या नव्या कार्यकाळाची दमदार सुरुवात केली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाची कमान युवा खेळाडूंच्या हाती सोपवण्यात आली आणि पहिल्याच दौऱ्यात युवा खेळाडूंनी विजयी कामगिरी केली.
भारताच्या युवा खेळाडूंची दमदार कामगिरी
श्रीलंकाविरुद्धच्या तीन टी20 सामन्यात यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, कर्णधार सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई आणि रियान पराग या युवा खेळाडूंनी आपली छाप उमटवली. पण याला अपवाद ठरला तो विकेटकिपर-फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson). टी20 वर्ल्ड कप 2024 साठी संजू सॅमसनची टीम इंडियाच्या 15 खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली. पण संपूर्ण स्पर्धा त्याला बेंचवर बसून पाहावी लागली. त्यावेळी संजूबरोबर अन्याय झाला अशी ओरड क्रिकेट चाहत्यांनी केली.
त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात संजू सॅमनसची निवड करण्यात आली. टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने निवडलेल्या 15 खेळाडूंच्या यादीत संजूला स्थान देण्यात आलं. पण या संधीचा संजू सॅमनसला फायदा उचलता आला नाही. पहिल्या सामन्यात विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. पण त्यानंतर पुढच्या दोन सामन्यांसाठी संजू सॅमसनवर विश्वास दाखवण्यात आला. पण संजू या विश्वासाला पात्र ठरला नाही. दोन्ही सामन्यात संजू सॅमसन शुन्यावर बाद झाला. दुसऱ्या सामन्यात तीक्षणाने त्याला क्लिन बोल्ड केलं तर तिसऱ्या सामन्यात विक्रमासिंघने त्याला झेलबाद केलं. यावरुन सोशल मीडियावर संजू सॅमसनला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. संजू सॅमसनची क्रिकेट कारकिर्द संपली अशी चर्चा रंगली आहे.
युवा खेळाडूंमध्ये चुरस
सोशल मीडियावर सध्या 'Happy Retirement Sanju Samson' ट्रेंड करतंय. क्रिकेट चाहत्यांनी संजू सॅमसनला ट्रोल केलं आहे. संधी मिळूनही संजू सॅमसनला संधीचा फायदा उचलता आला नाही, अशा प्रतिक्रिया क्रिकेट चाहते देतायत. वास्तविक टीम इंडियात संधी मिळण्यासाठी युवा क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड चुरस आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात संधी दिलेल्या अनेक खेळाडूंना चांगली कामगिरी केल्यानंतरही श्रीलंका दौऱ्यातून वगळण्यात आलं. यात अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल या नव्या दमाच्या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना वगळून अनुभवी संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती.
एकदिवसीय संघातून वगळलं
टी20 मालिकेनंतर भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवलीज जाणार आहे. या मालिकेच्या संघातून संजू सॅमसनला वगळण्यात आलं आहे. विकेटकिपर-फलंदाज म्हणून ऋषभ पंत आणि केएल राहुलला संधी देण्यात आली आहे.