इरफाण पठाणच्या 'गाझा' समर्थनार्थ पोस्टवर पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया, म्हणाला 'जरा इथल्या हिंदूंना...'

भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने गाझामधील लहान मुलं ठार होत असताना त्यावर जग शांत आहे सांगत खंत व्यक्त केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 4, 2023, 04:33 PM IST
इरफाण पठाणच्या 'गाझा' समर्थनार्थ पोस्टवर पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया, म्हणाला 'जरा इथल्या हिंदूंना...' title=

भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील 10 वर्षांपर्यंतची मुलं विनाकारण ठार होत असताना जगाने मौन बाळगल्याने नाराजी जाहीर केली आहे. तसंत त्याने जागतिक नेत्यांनी एकत्र येत या अर्थहीन हत्या थांबवण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कानेरिया याने इरफान पठाणला पाठिंबा दर्शवला आहे. पण यासह त्याने पाकिस्तानमध्ये हिंदू नागरिकांसाठीही आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे. पॅलेस्टाइनमधील हमास या दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोबरला इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा करत त्यांच्यावर हल्ला सुरु केला आहे. 

इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील युद्धात आतापर्यंत 1400 जण ठार झाले असून, असंख्य जखमी झाले आहेत. दहशतवादी हल्ला आणि इस्रायलचा प्रतिहल्ला यावरुन जगभरातील अनेक राजकारणी, सेलिब्रेटी आणि खेळाडूंनी चिंता व्यक्त केली आहे. 

इरफान पठाणने शुक्रवारी इस्रायल-हमास युद्धावर एक्सवर पोस्ट शेअर केली. त्यात त्याने लिहिलं की, "प्रत्येक दिवशी, गाझामधील 0 ते 10 वर्षांची निष्पाप मुलं आपला जीव गमावत आहेत आणि जग शांत आहे. एक खेळाडू म्हणून मी याविरोधात फक्त आवाज उचलू शकतो. पण आता जगातील नेत्यांनी एकत्र येत या अर्थहीन हत्या रोखण्याची वेळ आली आहे".

दिनेश कानेरियाने इरफान पठाणने आवाज उठवल्याने त्याचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील हिंदूंचीही अशीच स्थिती आहे सांगत त्यांच्यासाठीही आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे. "इरफान भाई, तुला लहान मुलांच्या वेदना कळतात हे पाहून आनंद झाला. या मुद्द्यावर मी तुझ्यासोबत आहे. पण तू पाकिस्तानमधील हिंदूंबद्दलही बोल. पाकिस्तानमध्ये इथे काही वेगळी स्थिती नाही," असं दिनेश कानेरिया म्हणाला आहे.

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांना हमासविरोधातील लढा थांबवणार नाही असं सांगितलं आहे. तसंच गाझामध्ये इंधनाचा पुरवठा करण्यास परवानगी दिल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. 

"इस्रायल तात्पुरती युद्धविराम नाकारतो ज्यात आमच्या ओलीसांची सुटका समाविष्ट नाही. इस्रायल गाझामध्ये इंधन प्रवेश करण्यास सक्षम करणार नाही आणि पैसे पाठविण्यास विरोध करतो", असं त्यांनी परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं.