'विराट कोहली झिम्बाब्वे, नेपाळविरोधात खेळला...', मोहम्मद आमीरने केली तुलना, म्हणाला 'महान खेळाडू...'

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याची नेहमीच इतर दिग्गज खेळाडूंशी तुलना केली जाते. या सर्व टीकाकारांना पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीरने उत्तर दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 4, 2023, 03:39 PM IST
'विराट कोहली झिम्बाब्वे, नेपाळविरोधात खेळला...', मोहम्मद आमीरने केली तुलना, म्हणाला 'महान खेळाडू...' title=

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा रेकॉर्डची बरोबरी करण्यापासून फक्त एक शतक दूर आहे. विराट कोहलीने श्रीलंकेविरोधात 88 धावा केल्या. 12 धावांनी त्याचं शतक हुकलं. न्यूझीलंडविरोधातील सामन्यातही 5 धावांनी शतकाने त्याला हुलकावणी दिली होती. दरम्यान यानिमित्ताने पुन्हा एकदा विराट कोहली सध्याचा सर्वात महान खेळाडू असल्याची चर्चा सुरु झाली असून, इतरांशी त्याची तुलना केली जात आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीरने विराट कोहलीची इतरांशी तुलना करणाऱ्या सर्वांना शांत केलं आहे. 

जिओ न्यूजमधील कार्यक्रमात आमीरने विराट कोहलीची इतर फलंदाजांशी तुलना करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. जर विराट कोहली नेपाळ, नेदरलँड, झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यासारख्या छोट्या संघांविरोधातील मालिका खेळला असता तर त्याने कधीच सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला असता असं मोहम्मद आमीरने सांगितलं आहे.
 
"मला कळत नाही की लोक विराट कोहलीची सतत तुलना का करत असतात. कोणत्याही प्रकारची तुलना करणं मूर्खपणा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खेळाडूचा हेतू पाहिला पाहिजे. श्रीलंकेविरोधात तो प्रत्येक चेंडू खेळत होता. तो प्रयत्न करत होता," असं आमीर म्हणाला.

पुढे त्याने सांगितलं की, "जर विराट कोहली नेदरलँड, नेपाळ, बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्याविरोधातील मालिकांमध्ये खेळला असता तर कधीच सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला असता. पण तो या संघांविरोधात खेळतच नाही. विराट हा महान खेळाडू आहे".

श्रीलंकेविरोधाकील सामन्यात, विराट कोहलीने 88 धावा केल्या. यासह वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक त्याच्या पुढे आहे.

"आम्ही अधिकृतरीत्या पात्र झालो आहोत याचा आनंद आहे. चेन्नईमध्ये आम्ही सुरुवात केली तेव्हा संघाकडून चांगला प्रयत्न झाला. आधी पात्रता मिळवणे आणि नंतर उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत पोहोचणे हे आमचे ध्येय होते. आम्ही सर्व 7 सामन्यात चांगले खेळलो. प्रत्येकाने प्रयत्न केले असून काही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली," असं विराट विजयानंतर म्हणाला होता.