David Willey Retirement: विश्वचषक स्पर्धेतील सर्वात वाईट टप्प्यातून जात असलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. संघातील एका महत्त्वाच्या सदस्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 33 वर्षीय अष्टपैलू डेव्हिड विलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला.
वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे डेव्हीडने जाहीर केले आहे. विलीला या विश्वचषकात आतापर्यंत फक्त 3 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यामध्ये त्याने खालच्या क्रमावर फलंदाजी करताना 42 धावा केल्या आहेत आणि 5 बळी घेतले आहेत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने विलीचा 2023-24 च्या वार्षिक करारात समावेश केला नाही.
विलीने सोशल मीडियावर आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मला हा दिवस यावा असे कधीच वाटले नाही. मी लहानपणापासून इंग्लंडसाठी क्रिकेट खेळण्याचे फक्त स्वप्न पाहत होतो. मी खूप विचार करून आणि मोठ्या खेदाने हा निर्णय घेतला आहे, असे तो म्हणाले. 'मला असे वाटते की वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. विश्वचषकानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही, असेही त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.
सध्या पॉइण्ट्स टेबल पाहिला तर इंग्लंडचा संघ तळाशी आहे. मात्र इंग्लंडच्या संघाने बांगलादेशपेक्षा एक सामना कमी खेळला असून इंग्लंडचा संघही पात्र ठरण्याची शक्यता अगदी एक टक्के आहे. मात्र बांगलादेशची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. बांगलादेश आणि इंग्लंड वगळता नेदरलॅण्ड, श्रीलंका, अफगाणिस्तान हे संघ तळाच्या पाच संघांमध्ये आहेत.
अव्वल संघांबद्दल बोलयचं झालं तर 6 पैकी 6 विजय मिळवून भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 5 विजयांसहीत दुसऱ्या स्थानी असून न्यूझीलंड 4 विजयांसहीत तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियन संघही 4 विजयासहीत चौथ्या क्रमांकावर आहे. नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंड हा ऑस्ट्रेलियापेक्षा सरस आहे.