Deepak Chahar on CSK: आयपीएलमध्ये एखाद्या खेळाडूचं भवितव्य काय असेल याबाबत अंदाज वर्तवणं थोडं कठीणच आहे. दीपक चहर (Deepak Chahar) हा चेन्नईचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात चांगलीच स्पर्धा पाहायला मिळाली. पण अखेर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाला यश मिळालं आणि त्याला आपल्या संघात घेतलं. दीपक चहर 2018 पासून चेन्नई संघाचा भाग आहे. यापुढेही त्याला प्रवास चेन्नईस संघासोबतच असावा अशी त्याची इच्छा होती. पण मेगा लिलावात त्याच्या नशिबाने वेगळं वळण घेतलं आहे. चेन्नई संघात येण्यात अपयशी ठरला असला, तरी दीपक चहरची मात्र काहीच तक्रार नाही.
दीपक चहरने 'स्पोर्ट्स तक'शी संवाद साधताना म्हटलं की, "चेन्नईसोबतच्या आपल्या विशेष कनेक्शनसाठी महेंद्रसिग धोनी कारणीभूत आहे. त्याच्यामुळेच आपल्याला आयपीएलमधील पुढील प्रवासही चेन्नईसह करण्याची इच्छा होती. पण मेगा लिलावातील नव्या नियमांनी तसं होऊ दिलं नाही".
"माहीभाईने मला सुरुवातीपासून पाठिंबा दिला, त्यामुळेच मला चेन्नई संघात जायचं होतं. पण माझं नाव लिलावात दुसऱ्या दिवशी आलं, त्यामुळे चेन्नईला मला संघात घेणं थोडं अवघड होईल याची मला कल्पना होती. त्याच्या पर्समध्ये फार पैसे नव्हते. 13 कोटींची पर्स असतानाही त्यांनी 9 कोटीपर्यंत प्रयत्न केले," अशी भावना दीपक चहरने व्यक्त केली आहे.
दीपक चहरचं नाव लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आलं. तोपर्यंत चेन्नई संघाने इतर खेळाडूंवर बऱ्यापैकी पैसे खर्च केले होते. त्यांच्याकडे फक्त 13 कोटी उरले होते. ज्यामुळे दीपक चहरला चेन्नईला आता त्याला विकत घेणं सोपं जाणार नाही याची जाणीव होती. "हे फार कठीण जाणार आहे यासाठी मी माझ्या मनाची तयारी केली होती. गेल्यावर्षी माझं नाव पहिलं आल्याने चेन्नईला सोपं गेलं होतं," असं तो म्हणाला आहे.
दीपक चहर गेल्या अनेक वर्षांपासून चेन्नईकडून खेळत असून त्याला तिथे बराच वाव मिळाला आहे. धोनीच्या नेतृत्वात खेळाडू म्हणून त्याच्यात अनेक सुधारणा झाल्या आहेत. मात्र आयपीएल 2025 च्या निमित्ताने त्याला आता नव्याने स्वत:चा शोध घेण्याची संधी मिळेल. हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मासह खेळताना कदाचित त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही याचा फायदा होईल.