एमएस धोनी : याच दिवशी सुरू झाला भारताच्या सगळ्यात यशस्वी कर्णधाराचा प्रवास

१४ सप्टेंबर २००७, भारतीय क्रिकेटमधल्या धोनी पर्वाला सुरुवात

Updated: Sep 14, 2020, 10:08 PM IST
एमएस धोनी : याच दिवशी सुरू झाला भारताच्या सगळ्यात यशस्वी कर्णधाराचा प्रवास

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा सगळ्यात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. १५ ऑगस्टला धोनीने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. भारताच्या या सर्वोत्तम कर्णधाराच्या नेतृत्वाचा उदय आजच्याच दिवशी १३ वर्षांपूर्वी झाला होता. १४ सप्टेंबर २००७ चा तो दिवस आणि पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तानच्या मॅचसाठी जो काही रोमांच, थरार आणि मसाला लागतो, तो या मॅचने क्रिकेट रसिकांना दिला.

कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच मॅचमध्ये बॉल आऊटमधून विजय मिळवत पुढे धोनीनं भारताला २००७ टी-२० वर्ल्ड कप, २०११ वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ हे किताब पटकवून दिले. आयसीसीच्या या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी हा जगातला एकमेव कर्णधार आहे. याचसोबत धोनीच्या नेतृत्वात भारत पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेटमध्येही पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. 

२००७ टी-२० वर्ल्ड कपमध्ये धोनी पाकिस्तानविरुद्ध कर्णधार म्हणून पहिल्यांदा मैदानात उतरला. खरं तर या वर्ल्ड कपमध्ये भारताला स्कॉटलंडविरुद्ध आपला पहिला सामना खेळायचा होता, पण पावसामुळे ही मॅच रद्द करण्यात आली. 

१४ सप्टेंबर २००७ला धोनीने पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच भारताचं नेतृत्व केलं. रोमांचक अशा या मॅचमध्ये भारताने बॉल आऊटमध्ये पाकिस्तानचा ३-०ने पराभव केला. पुढे जाऊन भारताने पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही भारताने पाकिस्तानलाच पराभवाची धूळ चारली. 

योगायोग म्हणजे धोनीचा कर्णधार म्हणून पहिला सामना आणि शेवटचा सामनाही टाय झाला. २०१८ साली आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीने भारताचं नेतृत्व केलं. ही मॅचही टाय झाली होती. आशिया कपमध्ये विराटच्या अनुपस्थितीमध्ये भारत रोहितच्या नेतृत्वात खेळत होता, पण अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये रोहितने विश्रांती घेतल्यामुळे धोनीने टीमचं नेतृत्व केलं होतं. 

धोनीने भारताचं सर्वाधिक ३३२ आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये नेतृत्व केलं. यामध्ये २०० वनडे, ६० टेस्ट आणि ७२ टी-२० मॅचचा समावेश आहे. धोनीने २००७ ते २०१८पर्यंत भारतीय टीमचं नेतृत्व केलं. या कालावधीत धोनीने १७८ विजय मिळवले, यामध्ये वनडेत ११०, टेस्टमध्ये २७ आणि टी-२० मध्ये ४१ विजयांचा समावेश आहे.