रांची : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं कर्णधारपद का सोडलं याचा खुलासा केला आहे. २०१९ च्या वर्ल्ड कपसाठी विराटला संघ बांधणीसाठी वेळ मिळावा म्हणून मी कर्णधारपद सोडल्याचं धोनीनं सांगितलं. नवीन कर्णधाराला वर्ल्ड कपआधी पुरेसा वेळ मिळावा हे माझं कर्णधारपद सोडण्याचं कारण होतं, असं धोनी म्हणाला आहे. नव्या कर्णधाराला योग्य वेळ न देता बलवान टीम बनवणं अशक्य असतं. मी योग्यवेळी कर्णधारपद सोडलं, अशी प्रतिक्रिया धोनीनं दिली आहे.
धोनीच्या नेतृत्वात भारतानं २००७ साली पहिल्यांदाच खेळवला गेलेला टी-२० वर्ल्ड कप जिंकला. २०११ साली भारतानं ५० ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला तेव्हाही धोनीच कर्णधार होता. २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी भारतानं धोनीच्याच नेतृत्वात जिंकली होती. आयसीसीच्या या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. नोव्हेंबर २०१४ साली धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर २०१७ साली त्यानं वनडे आणि टी-२०चं कर्णधारपद सोडलं.
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या भारताच्या पराभवावरही धोनीनं भाष्य केलं आहे. टेस्ट सीरिजआधी भारतीय टीमनं कमी सराव सामने खेळणं हे पराभवाचं एक कारण असल्याचं धोनी म्हणाला. कमी सराव सामने खेळल्यामुळे भारतीय बॅट्समनना तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं कठीण झालं, असं वक्तव्य धोनीनं केलं. हा खेळाचाच भाग आहे. भारतीय टीम पहिल्या क्रमांकावर आहे हे विसरून चालणार नाही, असं धोनी म्हणाला.