विजय हजारे ट्रॉफीसाठी अजिंक्य रहाणेकडे मुंबईचं कर्णधारपद

भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला नवी जबाबदारी मिळाली आहे. 

Updated: Sep 13, 2018, 05:37 PM IST
विजय हजारे ट्रॉफीसाठी अजिंक्य रहाणेकडे मुंबईचं कर्णधारपद

मुंबई : भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला नवी जबाबदारी मिळाली आहे. विजय हजारे ट्रॉफीसाठी अजिंक्य रहाणेची मुंबईचा कर्णधार म्हणून निवड झाली आहे. बंगळुरूमध्ये १९ सप्टेंबरपासून विजय हजारे ट्रॉफी सुरु होणार आहे. विकेट कीपर बॅट्समन आदित्य तरेऐवजी रहाणेकडे कर्णधारपद देण्यात आलं आहे. तर श्रेयस अय्यरला उपकर्णधार बनवण्यात आलंय. पृथ्वी शॉलाही मुंबईच्या टीममध्ये संधी देण्यात आली आहे.

रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेनं २५७ रन केले. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश होता. भारताला रहाणेकडून उपकर्णधारासारख्या प्रदर्शनाची अपेक्षा होती, पण त्याला तशी कामगिरी करता आली नाही.

पहिल्या टेस्टमध्ये रहाणेनं १५ आणि २ रनची खेळी केली. या मॅचमध्ये भारताचा फक्त ३१ रननी पराभव झाला. दुसऱ्या टेस्टमध्ये रहाणेनं १८ आणि १३ रन केले. तिसऱ्या टेस्टमध्ये रहाणेनं ८१ आणि २९ रनची खेळी केली. ही टेस्ट मॅच भारतानं २०३ रननी जिंकली.

चौथ्या टेस्टमध्ये रहाणेनं ११ आणि ५१ रन केले. या मॅचमध्येही भारताचा थोडक्यात म्हणजेच ६० रननी पराभव झाला. पाचव्या टेस्टमध्ये रहाणेनं पहिल्या इनिंगमध्ये शून्य आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ३७ रन केले.

आशिया कपमध्ये रहाणेला संधी नाही

१५ सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया कपला सुरुवात होत आहे. आशिया कपसाठीच्या भारतीय टीममध्ये रहाणेला संधी देण्यात आलेली नाही. रहाणे यावर्षी आयपीएलमध्ये राजस्थानचा कर्णधार होता. बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथवर बंदी घालण्यात आल्यानं स्मिथऐवजी रहाणेला कर्णधार बनवण्यात आलं होतं.

मुंबईची टीम

अजिंक्य रहाणे(कर्णधार), श्रेयस अय्यर(उपकर्णधार), पृथ्वी शॉ, जय बिष्ट, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सिद्धेश लाड, आदित्य तरे, एकनाथ केरकर, आकाश पारकर, धवल कुलकर्णी, शम्स मुलानी, विजय गोहिल, तुषार देशपांडे, रोस्टन डायस