मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताला १-२ने पराभव सहन करावा लागला होता. या सीरिजनंतर भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं. दुसऱ्या वनडेमध्ये धोनीनं केलेल्या संथ फलंदाजीनंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. तसंच तिसरी वनडे संपल्यानंतर धोनीनं अंपायरकडून बॉल मागून घेतला. २०१४ मध्ये टेस्टमधून निवृत्त होण्याआधीही धोनीनं अशाच प्रकारे अंपायरकडून बॉल घेतला होता. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा उधाण आलं होतं. पण वनडेनंतर बॉल घेण्याबद्दल आता खुद्द धोनीनंच प्रतिक्रिया दिली आहे.
बॉल रिव्हर्स स्विंग कसा होईल हे पाहण्यासाठी मी अंपायरकडून बॉल घेतला होता. खेळताना तुम्हाला नेहमी नवीन गोष्टी करण्याचा विचार करावा लागतो. वनडे सीरिजमध्ये भारतीय बॉलरना रिव्हर्स स्विंग करता येत नव्हता पण इंग्लंडचे बॉलर रिव्हर्स स्विंग करत होते. पुढचा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यासाठी भारतीय बॉलरना रिव्हर्स स्विंग करण्यासाठी नवीन काहीतरी शिकावं लागणार आहे म्हणून मी अंपायरकडून बॉल घेतला आणि आमचे बॉलिंग प्रशिक्षक भारत अरुण यांना दिला. तसंच बॉल रिव्हर्स स्विंग करण्यासाठी काय करायचं हे आपल्याला शोधायला लागणार आहे, असं भारत अरुण यांना सांगितल्याचं धोनी म्हणाला.
या वनडे सीरिजनंतर आता भारत इंग्लंडमध्ये २०१९चा वर्ल्ड कप खेळणार आहे. धोनीचं हे वक्तव्य म्हणजे त्यानं २०१९ वर्ल्ड कपची तयारी आतापासूनच करायला सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल.
Here's the video of the MS Dhoni taking the ball from umpires after the game. #ENGvIND pic.twitter.com/C14FwhCwfq
— Sai Kishore (@KSKishore537) July 17, 2018